पुण्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा; रक्तदान करण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

तुमच्या जवळच्या रुग्णालयात किंवा रक्तपेढीत जाऊन नक्की रक्तदान करा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनीही केले आहे. याचे कारण पुण्यात दिवाळीच्या सुट्टीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.

    पुणे : पुणेकरांनो, रुग्णशय्येवर अत्यवस्थ असलेला जिवलग तुमच्या रक्तदानाची वाट बघतोय. दिवाळी संपल्यानंतर सुरू होणाऱ्या आठवड्याची सुरवात रक्तदान करून करा अशी आर्त साद रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या रुग्णालयात किंवा रक्तपेढीत जाऊन नक्की रक्तदान करा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनीही केले आहे. याचे कारण पुण्यात दिवाळीच्या सुट्टीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.
    शहरातील २७ पैकी बहुतांश रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याची स्थिती चिंताजनक अशीच आहे. त्यामुळे रुग्णाच्या रक्तगटाला पूरक रक्त मिळविण्यासाठी नातेवाइकांची वणवण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात रक्ताची मागणी वाढली आहे, पण त्या तुलनेत रक्तसंकलन खूपच कमी झाले. रक्तपेढीकडे असलेल्या रक्ताच्या पिशव्या रुग्णांना वितरित करण्यात आल्या. मात्र, नव्याने रक्तदान न झाल्याने साठा कमी झाला.
    दिवाळी आणि उन्हाळा या दोन्ही सुट्ट्यांमध्ये पुण्यात रक्ताची कमतरता निर्माण होते. या दरम्यान महाविद्यालयांनाही सुट्टी असते. कंपन्यांमधील कर्मचारी गावाकडे किंवा पर्यटनासाठी पुण्याबाहेर गेलेले असतात. त्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी होते. या सर्वांचा फटका सध्या पुण्यातील अत्यवस्थ रुग्णांना बसत आहे.
    दिवाळीच्या सुट्टीमुळे नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. तसेच अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचीही वेगाने वाढली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात रक्तगटनिहाय रक्तपिशव्या रुग्णांना देण्यात आल्या. त्याचा थेट परिणाम झाल्याची माहिती वेगवेगळ्या रक्तपेढ्यांतील व्यवस्थापकांनी दिली. त्यातच सध्या डेंगीचे रुग्णही उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) देण्यातही सध्या मोठी समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.