ब्ल्यू जेट मधून उर्वरित चारही मृतदेह बाहेर काढण्यात यश, मृतांची संख्या ११

शनिवारी दुपारपर्यंत त्यापैकी सात जणांचे मृतदेह काढता येणे शक्य झाले. मात्र उर्वरित व्यक्ती अडचणीच्या ठिकाणी असल्याने त्यांचा शोध घेता आला नाही.

    महाड : ब्ल्यू जेट कारखान्याच्या दुर्घटनाग्रस्त प्लँटमधून आज उर्वरित चारही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यामुळे मरण पावलेल्या व्यक्तिंची संख्या ११ झाली आहे.

    शुक्रवारी या कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर अकरा व्यक्ती प्लँटमध्ये अडकल्या असल्याचे निष्पन्न झाले होते. शनिवारी दुपारपर्यंत त्यापैकी सात जणांचे मृतदेह काढता येणे शक्य झाले. मात्र उर्वरित व्यक्ती अडचणीच्या ठिकाणी असल्याने त्यांचा शोध घेता आला नाही. त्यानंतर मृतदेह शोधण्याचे काम थांबवून शोधकार्यात अडथळा ठरणारे ड्रम, कोसळलेल्या स्लॅब हटविण्याचे काम सुरु करण्यात आले.

    एमएमएचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या नेतृत्वाखाली, एमएमए मार्गच्या टीमने सोमवारी हे काम पूर्ण केले. हा संपूर्ण परिसर पूर्ण मोकळा झाल्यानंतर आज दुपारी या ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर सायंकाळपर्यंत उर्वरित तिघांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. एमएमए मार्गच्या टीमसोबत अपघातग्रस्तांच्या मदतीला टीमने हे मृतदेह यशस्वी पणे बाहेर काढून आपल्या शोध कार्याची सांगता केली. या मृताचीही ओळखपटू शकले नाही. त्यामुळे डीएनए चाचणी करण्यासाठी ते पनवेल येथे पाठविण्यात येणार आहेत.