गुन्ह्यात जप्त केलेल्या कारमध्ये सापडला मृतदेह; हडपसरमधील प्रकाराने एकच खळबळ

हडपसर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या चारचाकी गाडीत एकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

    पुणे : हडपसर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या चारचाकी गाडीत एकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. सतीश प्रभू कांबळे (वय ४६, रा. महात्मा फुले वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे मृतावस्थेत सापडलेल्याचे नाव आहे.

    काही दिवसांपुर्वीच हडपसर पोलिसांनी चोरट्यांकडून चारचाकी जप्त केली होती. हडपसर पोलीस ठाण्याच्या परिसरात उड्डाणपुलाजवळ जप्त केलेली चारचाकी लावली होती. सोमवारी सायंकाळी गाडीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाहणी केली. तेव्हा मागील बाजूस असलेल्या शिटवर कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला.

    या घटनेची माहिती वाऱ्यासारख्या परिसरात पसरली. त्यामुळे काही वेळातच पाहणाऱ्यांची तोबा गर्दी झाली होती. दरम्यान, माहिती घेतली तेंव्हा सतीश कांबळे असे या व्यक्तीचे नाव असल्याचे दिसून आले. ते हडपसर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर राहत होते. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, त्यांचा मुलगा अमीत तेथे आला. तेव्हा त्याने मृतदेहाची ओळख पटवली. कांबळे यांना दारु पिण्याचे व्यसन होते. १५ ऑक्टोबर रोजी ते घरातून बेपत्ता झाले होते, अशी माहिती कांबळे कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.