जळगावात केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट; दोन जणांचा होरपळून मृत्यू, 20 पेक्षा अधिकजण गंभीर

जळगावमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 'सेक्टर डी'मधील मोरया ग्लोबल या केमिकल कंपनीमध्ये बुधवारी मोठी दुर्घटना घडली. यात बॉयलरचा मोठा स्फोट होऊन दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 20 पेक्षा जास्त जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

    जळगाव : जळगावमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ‘सेक्टर डी’मधील मोरया ग्लोबल या केमिकल कंपनीमध्ये बुधवारी मोठी दुर्घटना घडली. यात बॉयलरचा मोठा स्फोट होऊन दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 20 पेक्षा जास्त जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले.

    यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, समाधान पाटील असे एका मृत कामगाराचे नाव आहे. आगीत जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्याची प्रशासनाने माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मोरया ग्लोबल केमिकल कंपनीतील बॉयलरचा सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाल्याने केमिकल कंपनीला भीषण आग लागली. आग लागली त्यावेळी कंपनीत एकूण 25 कर्मचारी होते. आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

    दरम्यान, या आगीत मोठी हानी झाल्याची भीती आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्फोटामुळे लागलेल्या आगीत 20 पेक्षा अधिक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.