pradeep sharma

प्रदीप शर्मा (Pradeep Sharma)यांनी त्यांचा जुना पोलीस सहकारी सचिन वाझेला हिरेनला मारण्यात मदत केल्याचा आरोप एनआयएने केला आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ 25 फेब्रुवारी 2021 ला एका गाडीत काही स्फोटके आढळली होती. त्या एसयुव्ही गाडीचा मालक हिरेन होता. ज्याचा खून करण्यात आला होता.

  मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सोमवारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. प्रदीप शर्मा यांना अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणी (Antilia Case) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

  जस्टीस रेवती मोहिते डेरे आणि आर एन लढ्ढा यांच्या खंडपीठाकडून सांगण्यात आले की, शर्मा यांना विशेष कोर्टाने जामीन नाकारला आहे. त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. शर्मा यांना फेब्रवारी 2022 मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. या निर्णयाविरोधात शर्मांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

  अँटिलिया प्रकरण
  शर्मा यांनी त्यांचा जुना पोलीस सहकारी सचिन वाझेला हिरेनला मारण्यात मदत केल्याचा आरोप एनआयएने केला आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ 25 फेब्रुवारी 2021 ला एका गाडीत काही स्फोटके आढळली होती. त्या एसयुव्ही गाडीचा मालक हिरेन होता. ज्याचा खून करण्यात आला होता.

  कट रचण्याच महत्त्वाचा वाटा
  या प्रकरणात शर्मा यांना जून 2021 ला अटक करण्यात आली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.शर्मा यांचा दावा आहे की पोलिसांकडे या प्रकरणात कोणताही पुरावा नाही. मात्र एनआयएच्या मते हिरेनची हत्या करण्याचा कट रचण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. हिरेनला स्फोटकांच्या प्लॅनविषयी माहिती होती आणि तो सगळं सांगून टाकेल अशी भीती असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

  प्रदीप शर्मा कोण?
  महाराष्ट्रातली 1983 ची पोलिसांची बॅच प्रसिद्ध ठरली. या बॅचमध्ये प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रविंद्र आंग्रे, अस्लम मोमीन असे एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून सर्वत्र परिचित असलेले पोलीस अधिकारी होते. प्रदीप शर्मा याच बॅचमधले.

  नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ही बॅच 1984 साली पोलीस सेवेत कार्यरत झाली. प्रदीप शर्मा यांची पहिली नियुक्ती मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदावर झाली. त्यानंतर ते स्पेशल ब्रँचमध्ये गेले. नंतर मुंबई उपनगरातील पोलीस ठाण्यांचे प्रमुख, क्राईम इंटेलिजियन्समध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. त्यांनी अनेक गुंडांना संपवलं. ‘मुंबई माफिया’ या वेबसीरिजमध्ये प्रदीप शर्मांच्या आयुष्यातल्या पोलीस सेवेत असतानाचा एन्काऊंटरचा काळ दाखवला आहे.