एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ! सरसकट ‘इतका’ मिळणार बोनस

एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांना सरसकट 6000 रुपयांचा सानुग्रह बोनस सरकारकडून (Bonus to ST Workers) गुरुवारी जाहीर करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक पार पडली.

  मुंबई : एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांना सरसकट 6000 रुपयांचा सानुग्रह बोनस सरकारकडून (Bonus to ST Workers) गुरुवारी जाहीर करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत एसटीला पुढील काळात स्वमालकीच्या बसेस खरेदी करण्यासाठी 900 कोटी रुपये देण्यास सरकारने सहमती दर्शवली.

  यावेळी सामंत म्हणाले, मागील अनेक महिन्यांपासून तोट्यात असणाऱ्या एसटीची आर्थिक स्थिती काही प्रमाणात सुधारत असल्याचे चित्र आहे. खात्याअंतर्गत बढतीसाठी आवश्यक असणारी 240 दिवसांची अट रद्द होईपर्यंत सदर बढतीस स्थगिती देण्यात येईल. त्याचप्रमाणे सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याकरिता 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाशी बैठक घेऊन निर्णय देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

  पगारवाढीची थकबाकी लवकरच देणार

  या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कॅशलेस मेडिक्लेम योजनेसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर रुग्णालयांची निवड करण्यात येईल. या रुग्णालयामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची बिले महामंडळ देय करणार आहे. त्याचप्रमाणे घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतनवाढ दराच्या थकबाकीबाबत 30 नोव्हेंबरपूर्वी निर्णय घेण्यात येईल.

  एसटी कर्मचाऱ्यांबाबत अनेक सकारात्मक निर्णय

  जवळपास दोन वर्षांपूर्वी महामंडळाचे विलीनीकरण, सातवा वेतन आयोग आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्स्फूर्त संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. पण आता एसटी कर्मचाऱ्यांबाबत अनेक सकारात्मक निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येत असल्याचे चित्र आहे.