सीमावाद चिघळणार; तिकोंडी गावची कर्नाटकात विलीन होण्याची इच्छा

जत तालुक्यातील पूर्व भागातील गावांवरून महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद चिघळला आहे. त्यातच तिकोंडी ग्रामस्थांनी तुबची-बबलेश्वर पाणी समितीच्या नेतृत्वाखाली कर्नाटकचा ध्वज घेऊन ग्रामपंचायतीसमोर बसस्थानकापर्यंत घोषणा देत पदयात्रा काढली.

    सांगली – तिकोंडी गावच्या (Tikondi Village) गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये विलीन (Merge In Karnataka) होण्याची इच्छा जाहीर केली आहे. गावात कर्नाटकचा ध्वज (Karnataka Flag) घेऊन पदयात्रा काढली आणि गावच्या वेशीवरच्या कमानीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांचे छायाचित्र असलेला फलक (Board) लावण्यात आला आहे. दरम्यान, मिरज तालुक्यात कर्नाटकच्या अथणी-पुणे बसवर दगडफेक झाली. त्यानंतर दोन्ही राज्यांतील शासकीय बसेसची ये-जा बंद झाली आहे.

    जत तालुक्यातील पूर्व भागातील गावांवरून महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद चिघळला आहे. त्यातच तिकोंडी ग्रामस्थांनी तुबची-बबलेश्वर पाणी समितीच्या नेतृत्वाखाली कर्नाटकचा ध्वज घेऊन ग्रामपंचायतीसमोर बसस्थानकापर्यंत घोषणा देत पदयात्रा काढली. यामध्ये महातेश अमृतट्टी, वसीम मुजावर, महातेश रायचौड़ा, सोमनिंग चौधरी, अनिल हट्टी, रायगौंडा माडोळी यांचा समावेश होता. तिकोंडी गावापासून तीन किलोमीटरवर कर्नाटकातील विजयपूर जिल्हा आहे.

    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सीमा भागातून जाणाऱ्या सर्व बसेसच्या काचांना संरक्षित जाळ्या लावल्या आहेत, अशी माहिती सांगली विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

    ग्रामस्थांचा आरोप
    कर्नाटकने तीन वर्षांपासून तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी तिकोंडीजवळच्या तलावात सोडले आहे. कर्नाटक सरकार वेगवेगळ्या सुविधा व अनुदान देते, तर महाराष्ट्र सरकार म्हैसाळ योजनेचे पाणी देणार असे गेल्या ५० वर्षांपासून सांगत आहे. त्याच मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे. परंतु महाराष्ट्र सरकार कोणतीही सुविधा देत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.