शरद कळसकर, सचिन अंदुरे या दोघांना जन्मठेप तर वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनावळेकर, विक्रम भावे निर्दोष

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येला दहा वर्षे पूर्ण होत असताना या हत्याप्रकरणाचा निकाल आज लागला.

    पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येला दहा वर्षे पूर्ण होत असताना या हत्याप्रकरणाचा निकाल आज लागला. याप्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे, संजीव पुनावळेकर या तिघांना निर्दोषमुक्त करण्यात आले. याबाबतचा निर्णय पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिला.

    पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला डॉ. दाभोलकर यांची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. त्यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता.

    या हत्येचा सुरुवातीला पुणे पोलीस, त्यानंतर एटीएस आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास केला. या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले.

    पण आता याप्रकरणाचा निकाल समोर आला असून, शरद कळसकर, सचिन अंदुरे या दोघांना जन्मठेप तर वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनावळेकर, विक्रम भावे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.