खेळताना विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू; सात तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह हाती

मिडसांगवी येथील चैतन्य ज्ञानेश्वर देवकते (वय १४ वर्षे) हा नववीत शिकणारा विद्यार्थी विहरीच्या पाण्यात बुडाला. सात तास प्रयत्न केले. अखेर दुपारी तीन वाजता चैतन्यचा मृतदेह पाचोड येथील व्यक्तीने पाण्याबाहेर काढला.

    अहमदनगर : मिडसांगवी येथील चैतन्य ज्ञानेश्वर देवकते (वय १४ वर्षे) हा नववीत शिकणारा विद्यार्थी विहरीच्या पाण्यात बुडाला. सात तास प्रयत्न केले. अखेर दुपारी तीन वाजता चैतन्यचा मृतदेह पाचोड येथील व्यक्तीने पाण्याबाहेर काढला. मिडसांगवी गावावर शोककळा पसरली आहे. चैतन्यच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात केल्यानंतर गुरुवारी रात्री मिडसागंवी येथे अत्यसंस्कार करण्यात आले.

    मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य व त्याचा लहान भाऊ घराजवळ खेळत होते. तेथे शेजारीच विहीर आहे. चैतन्य विहरीच्या पाण्यात गेला व वर आला नाही असे त्याच्या लहान भावाने नागरीकांना सांगितले. सकाळी आठ वाजता ही घटना घडली. नागरीक धावले मात्र विहरीला ५६ फुट पाणी होते. चैतन्यचा शोध घेता येईना. भगवानराव हजारे, दत्तुनाना पठाडे. विष्णु थोरात ,सुभास सुळ, शत्रुघ्न जाधव यांच्यासह ग्रामस्थ जमले व प्रांतअधिकारी देवदत्त केकाण व महसुल व पोलिस प्रशासनाला माहीती दिली. त्यानंतर नगरपालिकेची अग्नीशामक दलाची टीम आली . त्यांनी प्रयत्न केले. मात्र चैतन्यचा पाण्यात शोध लागेना.

    अखेर पाचोड, पैठण भागातील काही पोहणारे व कृत्रीम आँक्सीजनचा वापर करुन पाण्यात जाणाऱ्या व्यक्तींना संपर्क साधला. दोन तासात ही टीम मिडसांगवीत आली. पोहणाऱ्या व्यक्तीने कृत्रीम आँक्सीजन वापरुन पाण्यात बुडी घेऊन पाच मिनीटात चैतन्यचा मृतदेह वरती आणला. यावेळी गावातील सुमारे दोनशे ते तिनशे ग्रामस्थ जमले होते. आठ वाजता पाण्यात बुडालेला चैतन्यचा मृतदेह सात तासानंतर पाण्याबाहेर काढला गेला.

    नायबत हसिलदार भानुदास गुंजाळ यांनी प्रशासकीय मदत पाठविली. मंडलअधिकारी अभीजीत खटावकर व तलाठी जालींदर सांगळे यांनी ग्रामस्थांना मदत केली. सहाय्यक फौजदार सुरेश बाबर व त्यांच्या सहकार्यांनी पंचनामा करुन चैतन्यचा मृतदेह
    शवविच्छेदनासाठी पाथर्डीत आणला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री मिडसांगवीत अत्यंसंस्कार करण्यात आले.