दारू प्यायला पैसे न दिल्याने मुलाने घरच पेटवलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार

वडिलांनी दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने घर पेटवून दिले. ही घटना गुरुवारी (दि. 4) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास चिखली प्राधिकरण येथे घडली.

    पिंपरी : वडिलांनी दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने घर पेटवून दिले. ही घटना गुरुवारी (दि. 4) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास चिखली प्राधिकरण येथे घडली. उत्तम किसन शिंदे (67, रा. चिखली प्राधिकरण) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास उत्तम शिंदे (वय 43) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास शिंदे याने दारू पिण्यासाठी वडील उत्तम शिंदे आणि आई यांच्याकडे पैसे मागितले. उत्तम शिंदे यांनी मुलाला दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून विकास याने वडिलांना मारण्याची धमकी दिली.
    तसेच दारू प्यायला पैसे न दिल्याने त्याने घर जाळून टाकण्याची धमकी देत घरातील कॅलेंडर गॅसवर पेटवले आणि हॉलमधील पडद्यांना आग लावली. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.