Uddhav Thackeray
संग्रहित फोटोे

  ठाणे : सत्तेचा माज आलेल्यांनी बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली. पण, खरा बुलडोझर घेऊन मी मुंब्र्यातील रस्त्यावर आलो आहे. आपली बॅनर फाडल्याचं मला कळलं. मात्र, निवडणुका येऊद्या तुमची मस्ती फाडतो, असा इशारा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे दिला आहे. ते मुंब्र्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
  त्यांनी शाखाचोरांचे रक्षण केले
  उद्धव ठाकरे म्हणाले, “पोलिसांचं धन्यवाद मानतो. कारण, त्यांनी शाखाचोरांचे रक्षण केले. प्रशासन हतबल झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज येथे काही घडलं असते, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. सत्तेची गादी भोगणाऱ्यांनी आधीच महाराष्ट्राची अब्रू घालवली आहे.”
  “…अन्यथा आम्ही येऊन तो खोका उचलून फेकून देईल”
  “खोके सरकारनं आमची शाखा पाडून एक खोका अडवून ठेवला आहे. आमच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे. तो खोका लवकरात लवकर उचलावा. अन्यथा आम्ही येऊन तो खोका उचलून फेकून देईल. नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल, तर पोलिसांना बाजूला सारून समोर या,” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं आहे.
  “…तर यांचे केस उपटून टाकल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही”
  “दिल्लीच्या कृपेने तुम्ही सत्तेवर बसला आहात. मर्दाची औलाद असाल, तर पोलीस बाजूला करून भिडा, आमची तयारी आहे. केसाला जरी धक्का लागला, तर यांचे केस उपटून टाकल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.