निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेसला खिंडार! नाशिकच्या माजी जिल्ह्याध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

कॉंग्रेस नेते तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उमेदवारी न मिळाण्यावरुन नाराज असलेल्या शेवाळे यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

    नाशिक : राज्यामध्ये लोकसभा निवडणूकीचे वार वाहत आहेत. मतदानाचे तीन टप्पे पार पडले असून उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. प्रचाराचा धुरळा उडालेला असताना कॉंग्रेसवा मोठा धक्का बसला आहे. नाशिकचे माजी जिल्ह्याध्यक्ष यांनी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पक्षाला राम राम ठोकला आहे. कॉंग्रेस नेते तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उमेदवारी न मिळाण्यावरुन नाराज असलेल्या शेवाळे यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

    तुषार शेवाळे यांचा भाजप प्रवेश

    कॉंग्रेस नेते म्हणून काम करत असलेले तुषार शेवाळे हे मालेगाव लोकसभा मतदारसंघामधून इच्छुक होते. मात्र कॉंग्रेसने त्यांची उमेदवारी नाकारली. यानंतर शेवाळे यांच्या नाराजीच्या अनेक चर्चा देखील रंगल्या. त्याचबरोबर तुषार शेवाळे यांनी नाशिक जिल्ह्याध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला होता. त्यानंतर आज तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये तुषार शेवाळे यांचा भाजप प्रवेश झालेला आहे.

    मोठी ताकद मी भाजपच्या मागे उभी करणार

    तुषार शेवाळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हा कॉंग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामध्ये लोकसभेचा प्रचार जोरात सुरु असताना तुषार शेवाळे यांचा भाजप प्रवेश कॉंग्रेसला खिंडार देणार ठरणार आहे. भाजप प्रवेशाबाबत मत व्यक्त करताना तुषार शेवाळे म्हणाले, माझा मित्रपरिवार मोठा आहे. माझे असंख्य कार्यकर्ते आहेत. ही मोठी ताकद मी भाजपच्या मागे उभी करणार आहे. माझी भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी पक्ष सोडला, असे मत तुषार शेवाळे यांनी व्यक्त केले आहे.