घाटकोपरमध्ये ब्रिटिशकालीन जलवाहिनी फुटली; रस्त्यांना नदीचे स्वरूप, स्थानिकांच्या घरात घुसले पाणी

    मुंबई : मुंबई येथील घाटकोपरच्या (Ghatkopar) असल्फा विभागात 72 इंचाची ब्रिटिशकालीन जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचा प्रचंड प्रवाह परिसरात पहायला मिळत असून रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यात अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे, दुकानांचे साहित्य वाहून गेले आहे.

    घाटकोपर येथील असल्फा पाईपलाईन विभागात ब्रिटिशकालीन 72 इंचाची जलवाहिनी अतिशय जीर्ण झालेली आहे, त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटल्याच्या घटना घडत आहे. या आधी देखील ही जलवाहिनी फुटून अक्षरशः घरे कोसळली होती. तर आता देखील ही जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे.

    या विभागातील पाणीपुरवठा राहणार बंद :

    एन विभागः  घाटकोपर उच्चस्तर जलाशय – राम नगर, हनुमान नगर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, शंकर मंदीर, जय मल्हार नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षा नगर, ए व बी कॉलनीचा काही परिसर, डी व सी म्युनिसिपल कॉलनी, रायगड विभाग, आनंदगड, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृत नगर, इंदिरा नगर 1 आणि 2, अमिनाबाई चाळ, गणेश मैदान, मौलाना कंपाऊंड, हरिपाडा, जगदुषा  नगर, कठोडीपाडा, भीमानगर, अल्ताफनगर, गेल्डानगर, गोळीबार मार्ग, नवीन दयासागर, जवाहरभाई प्लॉट, सेवानगर, ओ. एन. जी. सी. कॉलनी, माझगाव डॉक  कॉलनी, गंगावाडी गेट नंबर 2, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, साईनाथ नगर, पाटीदार वाडी, रामाजी नगर, भटवाडी, बर्वेनगर, काजू टेकडी, अकबरलाला कंपाऊंड, आझादनगर, पारसी वाडी, सोनिया गांधी नगर, खाडी मशीन, गंगावाडीचा काही परिसर या ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहेत.

    जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महानगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन एन प्रभागाचे सहाय्यक अभियंता यांनी केले आहे.