पंकजा मुंडे यांना थेट CM पदाची ‘ऑफर’; BRS चे महाराष्ट्रात बस्तान बसवण्यासाठी मोठ्या हालचाली, महाराष्ट्राच्या घसरत्या राजकारणाचा फायदा शेजारील राज्य घेणार का?

  मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असताना आता शेजारच्या राज्यातील मोठे पक्षसुद्धा याचा फायदा घेऊ पाहत आहेत. तेलंगाणा राज्याच्या सत्तेत असणारा बीआरएस पक्ष (BRS) हा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाहिरात करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आता आणखी भर म्हणून बीआरएसने आता पंकजा मुंडेंना थेट ऑफर देत त्यांच्या दुखत्या नसीवरच हात ठेवला आहे.

  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

  पंकजा मुंडेंच्या महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना, अचानक यातून बाहेर पडल्याने त्यांना या पदाची थेट ऑफर देऊन बीआरएसने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

  के. चंद्रशेखर राव यांचा मोठा डाव

  महाराष्ट्रात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण, या निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. तेलंगाणात सत्तेत असलेली मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष आता महाराष्ट्रात पाय रोवू पाहत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांतील अनेक नेते बीआरएसमध्ये दाखल होत आहेत. पण बीआरएसने एक मोठी खेळी खेळली आहे. या पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहराही तयार केला आहे.
  पंकजा मुंडेंना ऑफर
  बीआरएसनं मुख्यमंत्रीपदासाठी थेट भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ऑफर दिली आहे. आपल्याला भाजपमध्ये अनेकदा डावलण्यात आल्याची भावना पंकजा मुंडे यांच्यामध्ये आहे. तशी जाहीर नाराजी त्यांनी गोपिनाथ गडावर आपल्या भाषणात व्यक्त केली होती. यासाठी आपण अमित शहांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं त्यांच्या या कथित नाराजीचाच फायदा बीआरएस करुन घेताना दिसतो आहे.
  का दिली ऑफर?
  पंकजा मुंडेंच्या ऑफरबाबत सांगताना बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले, गोपिनाथ मुंडे यांनी संपूर्ण देशभरात भाजप रुजवण्याचं काम केलं. पण त्यांच्या मुलीवरच आज भाजपत अन्याय होत आहे. त्यामुळं पंकजा मुंडेंना बीआरएसमध्ये घेण्यासाठी आम्ही अध्यक्ष केसीआर यांच्याशी चर्चा करु. केसीआर त्यांना नक्कीच मुख्यंमत्रीपदाचा चेहरा बनवतील,
  पंकजांनी अद्याप प्रतिक्रिया नाही

  दरम्यान, पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदासाठी ही मोठी ऑफर मिळाली असली तरी यावर अद्याप मुंडे यांच्याकडून कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाही. पण त्या या ऑफरकडे कशा प्रकारे पाहतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  राजू शेट्टींनी नाकारली ऑफर
  बीआरएस हा शेतकऱ्यांचा पक्ष असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी ग्रामीण भागातील नेत्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना देखील बीआरएसनं प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर देऊ केली होती, पण त्यांनी ही ऑफर नाकारली. गेल्या काही दिवसांत बीआरएसनं छ्त्रपती संभाजी नगर आणि नांदेड इथं जाहीर सभा घेतली यामध्ये स्वतः केसीआर यांनी महाराष्ट्रातील प्रश्नांवर बीआरएस कशापद्धतीनं काम करु इच्छितं याची माहिती दिली होती.
  बावनकुळेंच्या भाच्याचा बीआरएसमध्ये प्रवेश
  दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाचे जयकुमार बेलाखडे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला असून आपल्या मामावर अर्थात बावनकुळेंवर त्यांनी ‘कंस मामा’ असं म्हणत कडवट टीकाही केली होती. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगिरथ भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. २७ जून रोजी आषाढी एकादशीला त्यांचा जाहीर प्रवेश होईल असं सांगितलं जात आहे. कारण या एकादशीला केसीआर स्वतः पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत.