येरवड्यात पुर्ववैमन्यासातून तरुणाचा निर्घृण खून, कोयत्याने केले सपासप वार

येरवड्यातील ब्रम्हा सनसिटी परिसरात बुधवारी रात्री तरुणावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला असून, हल्लेखोर पसार झाले आहेत.

    पुणे : येरवड्यातील ब्रम्हा सनसिटी परिसरात बुधवारी रात्री तरुणावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला असून, हल्लेखोर पसार झाले आहेत. अभिषेक दत्तू राठोड (वय २१, रा. चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अभिषेकचे वडिल दत्तू राठोड यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक याच्यावर आर्म अॅक्ट तसेच गंभीर मारहाण असे गुन्हे दाखल आहेत. तर, यातील काही आरोपींचे पोलीस रेकॉर्ड आहे. त्यांच्यात पुर्ववैमन्यास होते. दरम्यान, बुधवारी रात्री नऊच्या सुमारास अभिषेक हा ब्रम्हा सनसिटी परिसरातील एका वडेवालेच्या दुकानासमोर उभारलेला होता. तेव्हा आरोपी हातात कोयते व धारधार हत्यारे घेऊन आले. त्यांनी अभिषेक याच्यावर कोयत्याने व धारधार हत्याराने वारकरून त्याचा निर्घन खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाले.

    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राठोड याचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत कळू शकले नाही. मात्र, पोलिसांनी प्राथमिक चौकशीत साई उर्फ दादा पाटोळे व इतर पाच अशांची नावे निष्पन्न केली आहेत. त्यावरून आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पोलीस पथके तयार करण्यात आली असून, गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकांकडून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.