कोयत्याने वार करत तरुणाची निर्घृणपणे हत्या; दोघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

आर्थिक वादातून तरुणावर कोयत्याने वार करत त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामध्ये तरुणाच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी : आर्थिक वादातून तरुणावर कोयत्याने वार करत त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामध्ये तरुणाच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.१५) सायंकाळी बिरदवडी येथील बैलगाडा घाटात घडली. ईश्वर पंडित पवार (वय ३२, रा. बिरदवडी, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार काचोळे, हनुमंत नायकवाडी (रा. रोहकल, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर पवार सोमवारी सायंकाळी बैलगाडा घेऊन बिरदवडी येथील बैलगाडा घाटामध्ये गेला होता. त्यावेळी घाटात इतरही तरुण बैलगाडा घेऊन आले होते. ईश्वर हे बैलगाडा पळवण्याचा सराव करत असताना दोघेजण दुचाकीवरून तिथे आले. त्यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या कोयत्याने आणि कुऱ्हाडीने ईश्वर यांच्यावर वार केले. त्यात ईश्वर गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले.
    ईश्वर यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथे असलेल्या इतर लोकांना मध्ये न येण्यासाठी दमदाटी केली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून निघून गेले. नागरिकांनी ईश्वर यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार आर्थिक वादातून झाला असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.