उद्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प; काय मिळणार मुंबईकरांना? मालमत्ता कर कमी होणार? काय आहेत मुंबईकरांच्या अपेक्षा…

मुंबईकरांची महत्त्वाची अपेक्षा म्हणजे मालमत्ता करात कोणतीही वाढ नको, असं मुंबईकरांची अपेक्षा आहे. आगामी निवडणुका पाहता मुंबईकरांना खूश ठेवण्यासाठी मालमत्ता करात दरवाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. इतकेच नव्हे तर मुंबईकरांना खुश करण्यासाठी नव्या घोषणा होण्याची शक्यताच जास्त आहे.

    मुंबई : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला. यानंतर आता मुंबई महापालिकेचा 2023-2024 या वर्षाचा अर्थसंकल्प (BMC Budget 2023) उद्या (4 फेब्रुवारी) रोजी सादर करण्यात येणार आहे. यंदाचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा 50 हजार कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी निवडणुकीच्या (Election) तोंडावर मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार, यातून मुंबईकरांना काय मिळणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

    अनेक आव्हानांना तोंड देत अर्थसंकल्प सादर होणार

    कोरोना केंद्र घोटाळ्याप्रकरणी महापालिकेमागे असलेला कॅगचा ससेमिरा, रस्ते कंत्राटात झालेले भ्रष्टाचाराचे आरोप तसेच एसीबीकडून केल्या जाणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांच्या चौकशीचे सावट असतानाच यंदाचा २०२३ २४ चा अर्थसंकल्प शनिवारी, ४ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे.

    निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच…

    पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच आगामी अर्थसंकल्प तयार केला जाण्याची शक्यता असून, मुंबईकरांना खूश करण्यासाठी त्यात भरीव तरतूद केली जाण्याची चिन्हे आहेत. यंदाचा अर्थसंकल्प ५० हजार कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता असली तरी मुंबईकरांना यातून नेमके काय मिळणार याची उत्सुकता कायम आहे. विकासाच्या दृष्टीने कोणत्या योजना राबविल्या जाणार प्रकल्प मार्गी लावले जाणार आणि किती तरतूद करण्यात येणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

    मुंबईकरांना काय मिळणार?

    अर्थसंकल्पात शिक्षण विभाग, आरोग्यसेवा, कोस्टल रोड, गोरेगाव मुलंड लिंक रोड, यासाठी ही जास्त तरतूद केली जाऊ शकते. याशिवाय रस्ते, पूल, विविध रखडलेले प्रकल्प याकरिता भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. तसेच मलनिस्सारण प्रकल्प पर्जन्य जलवाहिन्या, उद्याने यासाठी तरतूद केली जाईल. इतकेच नव्हे तर बेस्टलासुद्धा मदतीचा हात मिळण्याची शक्यता आहे.

    मालमत्ता कर कमी होणार…

    मुंबईकरांची महत्त्वाची अपेक्षा म्हणजे मालमत्ता करात कोणतीही वाढ नको, असं मुंबईकरांची अपेक्षा आहे. आगामी निवडणुका पाहता मुंबईकरांना खूश ठेवण्यासाठी मालमत्ता करात दरवाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. इतकेच नव्हे तर मुंबईकरांना खुश करण्यासाठी नव्या घोषणा होण्याची शक्यताच जास्त आहे. सकाळी १०:३० वाजता महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक इकबाल सिंग चहल यांना सादर करणार आहेत, तर मुख्य अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु हे चहल यांना सादर करणार आहेत. त्यामुळं या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.