गृहनिर्माण क्षेत्राच्या उर्जितावस्थेसाठी शासन, बांधकाम व्यावसायिकांचे परस्पर सहकार्य आवश्यक – मुख्यमंत्री 

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आयोजित मालमत्ताविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, वाढत्या नागरीकरणामुळे आणि रोजगारानिमित्त मोठ्या शहरात स्थलांतरित होणाऱ्या सर्वसामान्यांसाठी चांगल्या दर्जाचे आणि परवडणारे घर असावे, हे स्वप्न असते. त्यांच्यासाठी मालमत्ता विषयक प्रदर्शन उपयुक्त ठरते.

    मुंबई : मुंबई परिसरातील पुनर्विकासाच्या कामांचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्यासाठी शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यासाठी शासनामार्फत आवश्यक सर्व ते सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शासनाने विविध सवलती दिल्याने बांधकाम व्यावसायिकांनी सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.

    कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया – महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री (क्रेडाई-एमसीएचआय) (CREDAI-MCHI) यांच्यावतीने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आयोजित मालमत्ताविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, वाढत्या नागरीकरणामुळे आणि रोजगारानिमित्त मोठ्या शहरात स्थलांतरित होणाऱ्या सर्वसामान्यांसाठी चांगल्या दर्जाचे आणि परवडणारे घर असावे, हे स्वप्न असते. त्यांच्यासाठी मालमत्ता विषयक प्रदर्शन उपयुक्त ठरते. सर्वसामान्यांना स्वस्तात घर उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने बांधकाम क्षेत्राला विविध सवलती दिल्या आहेत. या सवलतींमुळे बांधकाम क्षेत्राला संजीवनी प्राप्त झाली असून त्याचा लाभ ‘क्रेडाई’सारख्या संस्थांनी सर्वसामान्यांना करून द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    दरम्यान, यावेळी नगरविकास विभाग तथा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त एसआरव्ही श्रीनिवास, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इराणी, सचिव धवल अजमेरा आदी उपस्थित होते. 13 ते 16 ऑक्टोबर या काळात हे प्रदर्शन सुरू असणार आहे.