बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक मतदार; विधानपरिषद निवडणूकीत भूमिका ठरणार निर्णायक

मतदारसंघात मागील तीन टर्मपासून शिवसेनेचे आमदार बाजोरिया निवडून आले. कमी मतदार असताना सुद्धा मोठ्या शिताफीने बाजोरिया यांनी विजय प्राप्त केला होता. यंदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून त्यांचे मतदार या मतदारसंघात भाजपाच्या तुलनेत अधिक आहे. भाजपाला ही निवडणूक एकट्याला लढावी लागणार आहे.

  अकोला (Akola) :  यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांची संख्या वाढली आहे. नवीन मतदारांना कसे आकर्षित करायचे यासाठी उमेदवारांना कसब पणाला लावावे लागणार आहे. यंदा बुलडाणा जिल्ह्यातील ३६८ हे सर्वाधिक मतदार असल्याने हा जिल्हा या निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णायक भूमिका वठविणार आहे. त्या खालोखाल अकोला जिल्ह्यात २८५ तर वाशीम जिल्ह्यात १६८ मतदार आहेत.

  राज्यातील सहा विधान परिषदेच्या जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक होत आहे. त्यात अकोला-बुलडाणा-वाशीम या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे. यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीही राहू शकते. मागील तीन निवडणुकांमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपाने यंदा त्यांना घेरण्याची तयारी केली असून त्यासाठी भाजपाला तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे.

  या मतदारसंघात मागील तीन टर्मपासून शिवसेनेचे आमदार बाजोरिया निवडून आले. कमी मतदार असताना सुद्धा मोठ्या शिताफीने बाजोरिया यांनी विजय प्राप्त केला होता. यंदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून त्यांचे मतदार या मतदारसंघात भाजपाच्या तुलनेत अधिक आहे. भाजपाला ही निवडणूक एकट्याला लढावी लागणार आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराची दमछाक होणार आहे. भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय वसंत खंडेलवाल, ज्येष्ठ नगरसेवक हरिष अलीमचंदानी, माजी महापौर विजय अग्रवाल व मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांची नावे चर्चेत आहे.

  जिल्हा मतदार
  बुलडाणा—- ३६८
  अकोला —- २८५
  वाशीम —- १६८
  ——————
  एकूण — ८२१