जिल्ह्यामध्ये वीज नसल्यामुळे शेतकरी संतप्त, पाण्याच्या कमतरतेमुळे पीक सुकली, महावितरणला भेट देऊन मांडल्या समस्या…

पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. काही ठिकाणच्या विहिरीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे.

    बुलढाणा : मागील काही महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसत आहे अनेक ठिकाणी तर नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा शिल्लक राहिले नाही. अशा अनेक ठिकाणी सरकार अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या टँकरने पाणी पुरवत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. काही ठिकाणच्या विहिरीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे. ते पाणी देऊन शेतकरी पीक जगवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यास अडचण निर्माण होत आहे.

    नियमानुसार देण्यात आलेला वीजपुरवठा हा चारच तास देण्यात येत आहे त्यातूनही वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाण्याच्या मोटारी जळत आहेत. दरम्यान खामगाव महावितरण कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पारखेड, आंबोडा, चिखली, पहूर्जिरा, माटरगाव येथील ४० ते ५० शेतकऱ्यांनी आणि शेतकरी नेत्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना भेटून आपल्या समस्या मांडल्या. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या महावितरण कार्यकारी अभियंता यांच्या समोर मांडल्या अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पाणी असूनही ते शेतातील पिकाला पाणी देऊ शकत नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले.

    १५ दिवसापासून पाऊस नसल्यामुळे पीक सुकत चालली आहेत. सध्या शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला दिवसातून कमीतकमी ८ तास तरी वीज द्या अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की अधिकाऱ्यांना फोन केला की ते उडवा उडवीची उत्तरे देतात. महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की फक्त दिवसातून ४ तास वीज दिली जाईल परंतु या ४ तासांमध्ये पीक प्रचंड नासाडी होत आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.