बुलीबाई अ‍ॅप प्रकरण : आरोपी सिंह, रावतला न्यायालयीन कोठडी; वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश

मुस्लिम महिलांचे मानसिक आणि शारिरीक शोषण करणे, अ‍ॅपमध्ये (BulliBai App Case) मुस्लिमांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरून मुस्लिम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम बुलीबाई या अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू होते. दिल्लीपासून मुंबईपर्यंत महिलांनी याप्रकरणी तक्रारी केल्या आहेत.

  मुंबई : बुलीबाई या अ‍ॅपच्या (BulliBai App Case) माध्यमातून मुस्लिम समाजातील महिलांची हुतूपुरस्सर बदनामी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उत्तराखंडच्या श्वेता सिंह आणि मयंक रावत या दोघानाही मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

  मुस्लिम महिलांचे मानसिक आणि शारिरीक शोषण करणे, अ‍ॅपमध्ये (BulliBai App Case) मुस्लिमांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरून मुस्लिम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम बुलीबाई या अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू होते. दिल्लीपासून मुंबईपर्यंत महिलांनी याप्रकरणी तक्रारी केल्या आहेत.

  महिलांच्या ट्विटवर, इन्स्टाग्राम आणि फेबसुकवरुन माहिती घेत आणि त्यांचे फोटो चोरी करत टाकण्यात आले असून अशा १०० हून अधिक महिलांचे फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावण्यात येत असल्याचे समोर आले. त्याविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एफआयआर दाखल केली.

  बुलीबाईच्या डेव्हलपरविरुद्ध कलम १५३ अ,१५३ ब, २९५ अ, ३५४ ड, भारतीय दंड संहितेचे ५०० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ अंतर्गत गुन्ह्यांची नोंद केली. त्यानंतर ५ जानेवारी रोजी उत्तराखंडमधून श्वेता सिंह आणि मयंक रावत या दोघानाही ताब्यात घेण्यात आले. त्या दोघांनाही शुक्रवारी त्यांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयात न्यायदंडाधिकारी कोमलसिंग राजपूत यांच्यासमोर हजर करण्यात आले.

  तेव्हा, सायबर पोलिसांकडून चौकशीदरम्यान श्वेताला कानशिलात लगावण्यात आल्याची माहिती तिच्यावतीने देण्यात आली. न्यायालयाने तिला वेदना होत असल्याची विचारणाही केली. तेव्हा फक्त डोकेदुखी असल्याचे सिंह यांनी सांगतिले. दोघाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांकडून कऱण्यात आली. मात्र, ठोस कारण सादर करण्यास पोलीस अपयशी ठरल्याने न्यायालयाने सिंह आणि रावतला न्यायालयीन कोठडी सुनावली.

  रावतला कोरोनाची लागण

  रावतला शुक्रवारी सकाळी कोविडची लागण झाली असून त्याला कालिना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. दुसरीकडे, याप्रकरणातील पहिला आरोपी, विशाल कुमार झाही काही दिवसांपूर्वीच कोविड पॉझिटिव्ह आला होता.