राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार मोठा धक्का?; जाणून घ्या नेमकं काय होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय (National Party Status) केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे.

    नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय (National Party Status) केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेल्या दर्जामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्लीत देण्यात आलेला बंगला काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.

    ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा रद्द करण्यात आल्याने त्यासोबत मिळणाऱ्या सुविधाही आता कमी केल्या जाण्याबाबत हालचाली सुरु आहेत. त्यानुसार, बंगला काढून घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय या दोन्ही पक्षांना त्याबाबत नोटीसही दिली जाऊ शकते. या दोन्ही राजकीय पक्षांना देण्यात आलेले सरकारी बंगले काढून घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

    राष्ट्रीय दर्जा मिळाल्यास…

    कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच निवडणूक चिन्ह मिळते. त्याशिवाय नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जाते. निवडणुकीमध्ये दूरदर्शन किंवा इतर सार्वजनिक वाहिन्यांवर ब्रॉडकॉस्टिंगसाठी वेळ मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर या सर्वांसाठी पक्ष अपात्र ठरतात. त्यानुसार, तृणमूल काँग्रेस असो की सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना मिळालेल्या सुविधा कमी केल्या जाणार आहेत.

    आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

    या तिन्ही पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला असला तरी दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मात्र राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. कारण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी ज्या निकषाची गरज आहे. त्या सर्व निकषांची पूर्तता त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय दर्जा मिळाला आहे.