घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्यांना बेड्या, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त ; मुंढवा पोलिसांची कारवाई

पुणे शहरातील विविध भागात वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह दोघांना मुंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, १४ दुचाकी, सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम जप्त करुन १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

  पुणे : पुणे शहरातील विविध भागात वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह दोघांना मुंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, १४ दुचाकी, सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम जप्त करुन १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. गोरख विलास धांडे (वय २० रा. गोकूळ नगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

  ही कामगिरी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे, तपास पथकाचे सहायक निरीक्षक संदिप जोरे, पोलीस अंमलदार दिनेश राणे, दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, सचिन पाटील, स्वप्नील रासकर यांच्या पथकाने केली.

  दोघांना सापळा रचून घेतले ताब्यात

  पुणे शहरात वाहन चोऱ्या तसेच घरफोडीच्या घटना घडत आहेत. त्याचवेळी मुंढवा पोलीस त्यांच्याकडे दाखल असलेल्या वाहन चोरी गुन्ह्याचा तपास करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे व सचिन पाटील यांना दोन मुले संशयीत रित्या चोरीची दुचाकी घेऊन घोरपडी गाव येथील साज कंपनीजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले.

  ताब्यात घेतलेल्या दोघांकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता आरोपींनी दुचाकी चोरीची असल्याचे कबुल केले. आरोपींकडून मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेला वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपींकडे अधिक चौकशी करुन त्यांच्याकडून १४ दुचाकी तसेच कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील सोने-चांदी व रोख रक्कम जप्त केला. पोलिसांनी या कारवाईत एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  १२ गुन्हे उघडकीस

  गोऱख याला अटक करत त्याच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या १४ दुचाकीपैकी ११ दुचाकीबाबत पुणे शहर व परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहेत. तर इतर ३ वाहनांबाबत पोलीस तपास करीत आहेत. गोरख धांडे याच्यावर घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून मुंढवा, कोंढवा, हडपसर, वानवडी, सिंहगड रोड, पुणे ग्रामीण मधील राजगड, लोणावळा, सासवड पोलीस ठाण्यातील १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.