पुण्यात घरफोड्यांचं सत्र सुरुचं; दोन दिवसात पाच फ्लॅट फोडले

पुणे शहरात दोन दिवसात चोरट्यांनी शहरातील विविध भागात पाच बंद फ्लॅट फोडल्याचे समोर आले आहे. वानवडी, सोमवार पेठ, खडकी, विमानतळ व येरवडा परिसरात या घटना घडल्या आहेत.

    पुणे : पुणे शहरात दोन दिवसात चोरट्यांनी शहरातील विविध भागात पाच बंद फ्लॅट फोडल्याचे समोर आले आहे. वानवडी, सोमवार पेठ, खडकी, विमानतळ व येरवडा परिसरात या घटना घडल्या आहेत.

    पहिल्या घटनेत चोरट्यांनी दुपारी मोकळ्या वेळेत बहिणीला भेटण्यास गेलेल्या महिलेचे बंद घर भरदिवसा फोडत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी ३३ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वानवडी गावातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. त्या गृहिणी आहेत. त्या परिसरात त्यांची बहीण राहते. तक्रारदार दुपारी अडीच ते साडेपाचच्या वेळेत त्यांच्या बहिणीला भेटण्यास गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. किचनमधील कपाटात ठेवलेले सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ७५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास उपनिरीक्षक संतोष गायकवाड याचा तपास करत आहेत.

    तसेच, सोमवार पेठेतील राठी रुग्णालयाजवळील धनगर आळीत एका ५३ वर्षीय व्यक्तीच्या घर फोडले आहे. चोरट्यांनी येथून साडेबारा हजारांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच गुरूवारी तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून, पहिल्या घटनेत खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी भरदुपारी सचिन हटकर (वय ४७) यांचे घर फोडले आहे. चोरट्यांनी येथून २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे.

    तसेच, लोहगाव येथील जॅग्वार पेंट्स हे दुकान फोडत १५ ते २० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. तर येरवड्यातील शास्त्रीनगर येथे देखील दुकान फोडत चोरट्यांनी १६ हजारांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.