पुण्यात घरफोड्यांचं सत्र सुरुचं, एरंडवण्यातील फ्लॅट फोडला; साडे सहा लाखांचा ऐवज चोरला

लॉ कॉलेज रस्त्यावरील एका बहुमजली इमारतीमधील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी साडे सहा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. या घरफोडीसोबतच शहरातील इतर भागातही फ्लॅट फोडले असून, चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याचे दिसत आहे.

    पुणे : लॉ कॉलेज रस्त्यावरील एका बहुमजली इमारतीमधील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी साडे सहा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. या घरफोडीसोबतच शहरातील इतर भागातही फ्लॅट फोडले असून, चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अमित गांधी (वय ४९) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तक्रारदार लॉ कॉलेज रोडवरील एका सोसायटीत राहण्यास आहेत. १२ ते २० सप्टेंबर कालावधीत ते कुटूंबियासह बाहेर गावी गेले होते. त्यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी व मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, कपाटातील रोकड व एतर ऐवज असा एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

    तक्रारदार दोन दिवसांपुर्वी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यासोबतच शहरात अलंकार, खडकी आणि हडपसर परिसरात देखील घरफोड्या झाल्या असून, चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले आहेत.