पुण्यात घरफोड्यांचं सत्र सुरुच; मुंढवा, सोमवार पेठेतून १७ लाखांचा ऐवज केला लंपास

पुण्यात २ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. मुंढवा भागात फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील १२ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली. तसेचं चोरट्यांनी समर्थ परिसरात देखील फ्लॅट फोडून चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

    पुणे : मुंढवा भागात फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील ५ लाखांची रोकड तसेच दागिने असा १२ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली. याप्रकरणी गोपाळ झा (वय ३४, रा. गोपाळ कॉम्प्लेक्स, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    पोलिसांच्या माहितीनुसार, झा हे गोपाळ कॉम्प्लेक्स येथे राहण्यास आहेत. ते काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तेव्हा त्यांच्या फ्लॅट कुलुप उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तसेच बडेरूममधील कपाटातून ५ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा १२ लाख ९० हजार ७७९ रुपयांचा ऐवज चोरला. सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे तपास करत आहेत.
    दरम्यान, चोरट्यांनी समर्थ परिसरात देखील फ्लॅट फोडून चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार सोमवार पेठेतील १५ ऑगस्ट चौकात असलेल्या एका इमारतीत घडला आहे. याप्रकरणी महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेची खाणावळ आहे. त्यांच्या खाणावळीत विद्यार्थी येतात. महिलेने कपाटात ठेवलेले चार लाख रुपयांचे दागिने चोरल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक सौरभ थोरवे तपास करत आहेत.