खून उघड होऊ नये म्हणून शेडजवळ स्वत:च्या मुलीवर केले अंत्यसंस्कार; पोलिसांनी ‘असा’ केला उलघडा

वडिलांसह चुलत्याने सूर्यकला ऊर्फ सुरेखा संतोष सरोदे (१७) या मुलीचा झाडाला गळफास देऊन खून केला होता. घटना जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथे १३ डिसेंबर घडली हाेती. दुपारी ३.३० वाजता झाडाला लटकवून गळफास दिला अन् सायंकाळी ५ वाजता घराच्या उंबरठ्यापासून ७० मीटर अंतरावर कुक्कुटपालन शेडच्या आडोशाला अंत्यविधी उरकला.

    जालना : जालन्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. घरात काहीही न सांगता नातेवाईक मुलासोबत मुलगी 3 दिवस बाहेर गेली. यामुळे समाजात अपमान झाल्याचे सांगत संतापलेल्या वडिलांसह चुलत्याने सूर्यकला ऊर्फ सुरेखा संतोष सरोदे (१७) या मुलीचा झाडाला गळफास देऊन खून केला होता. घटना जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथे १३ डिसेंबर घडली हाेती. दुपारी ३.३० वाजता झाडाला लटकवून गळफास दिला अन् सायंकाळी ५ वाजता घराच्या उंबरठ्यापासून ७० मीटर अंतरावर कुक्कुटपालन शेडच्या आडोशाला अंत्यविधी उरकला. चंदनझिरा पाेलिसांनी गुन्हा उघड केला.

    पोलिसांनी घटनास्थळावरून अंत्यविधीची ४० किलो राख जप्त केली. गळफास दिलेली दोरीही अंत्यविधीत आरोपींनी जाळून टाकली हाेती. या प्रकारानंतर मारेकरी संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे या दोन्ही संशयितांची वेगवेगळी चौकशी केली. यात दोघांनी खून व नंतर अंत्यविधी केल्याची कबुली दिली. दोघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गजाआड करण्यात आले.

    चंदनझिरा ठाण्याचे ​उपनिरीक्षक गणेश झलवार म्हणाले की, संशयित दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुलीचा खून करण्यात, परस्पर अंत्यविधी करण्यात अजून कोण सहभागी आहे का, या दृष्टीने तपास सुरू आहे. पोलिस कोठडीमध्ये आणखी काही मुद्दे समोर येतील. या खुनात संपूर्ण कुटुंबाचाच सहभाग आहे का, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.

    मंदिरात लग्नाचे ठरले होते

    सूर्यकला ही घराजवळून ४ किमी अंतरावरील शाळेत अकरावीत शिक्षण घेत होती. मुलगी पळून गेल्याचे म्हणत नातेवाइकातील एका मुलाशी तिचे लग्न लावून देण्याचे ठरले. यानुसार मंदिरात लग्न करण्याच्या दृष्टीने नातेवाइक तेथे आले. परंतु, मुलीच्या नावावर जमीन करण्याच्या मागणीने हे लग्न झाले नाही.