Bus accident of Shivaji Vidyalaya in Indapur
Bus accident of Shivaji Vidyalaya in Indapur

    इंदापूर : इंदापूर तालुका बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल बसचा माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे परतीच्या प्रवासा दरम्यान भीषण अपघात झाला आहे. शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या बसचा परतीच्या मार्गावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे अपघात झाला असून प्राथमिक माहितीनुसार यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर शिक्षक व विद्यार्थी जखमी झाले आहेत.

    अकलूज येथील रुग्णालयात उपचार

    त्यांच्यावर अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बावडा श्री शिवाजी विद्यालय शैक्षणिक सहल (ता.19) रोजी रात्री गणपतीपुळे येथे गेली होती. त्यानंतर आज गुरुवार (ता. 21) रोजी सहल पहाटे परतत असताना माळशिरस तालुक्यातील पाटील वस्तीलगत सहलीची एस. टी बस (क्रमांक एस.टी. क्रमांक एम एच 14 बी टी 4701) व टेम्पो यांची धडक झाली.

    शिक्षक व विद्यार्थी जखमी

    यावेळी बसमध्ये चालक, 2 पुरुष व 2 महिला असे एकूण 4 शिक्षक व 40 विद्यार्थी होते. या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर अन्य शिक्षक व विद्यार्थी जखमी झाले असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजत आहे.