बस-टॅंकरची भीषण धडक; दोन ठार तर १५ जखमी; पाटस येथील घटना

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसने टॅंकरला जोरदार धडक (Accident in Patas) दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय सुमारे १५ प्रवासी जखमी झाले.

    पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसने टॅंकरला जोरदार धडक (Accident in Patas) दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय सुमारे १५ प्रवासी जखमी झाले. यामध्ये काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली.

    पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या बारामती फाटा येथे रात्री साडे अकराच्या सुमारास अपघात झाला. मारुती ग्यानबा वडेर (वय ५५, रा. मुखेड, जि.नांदेड ) असे ठार झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ट्रकचालक हवासिंग छीत्तरसिंग व प्रवासी अर्चना गणेश देशमुख यांच्यासह इतर प्रवासी जखमी झाले आहेत.

    याबाबत प्रवासी पांडुरंग ग्यानबा वडेर यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लक्झरी बसचालक गजानन वैजनाथ जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    समोरासमोर जोरदार धडक

    पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर येथून सोलापूरला भरधाव जाणाऱ्या लक्झरी बसने सोलापूरकडून पुणेकडे जाणाऱ्या टॅंकरला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात सोळा प्रवासी जखमी झाल्याने त्यांना पाटस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मारुती वडेर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.