सटाणा येथे दोन दुकाने फोडून चोरट्यांनी साडे पाच लाखांची रोकड केली लंपास; पोलिसांनी सीसीटीव्ही पाहताच…

राष्ट्रीय महामार्गावरील दोन मिठाईची दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी जवळपास ५ लाख ४५ हजार रुपयांवर रोकड लंपास केली. याप्रकरणी सटाणा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    सटाणा : येथील राष्ट्रीय महामार्गावरील दोन मिठाईची दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी जवळपास ५ लाख ४५ हजार रुपयांवर रोकड लंपास केली. याप्रकरणी सटाणा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    सटाणा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर शहराच्या मध्यवस्तीत एम.एम. स्वीट व अंबिका स्वीट्स ही दोन दुकाने आहेत. सकाळी दुकान मालक आल्यावर त्यांना दुकानाचे शटर उचकटल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. या घटनेत एम एम स्वीट्स या दुकानात ठेवलेली ५ लाख रुपये रोख रक्कम व अंबिका स्वीट्स दुकानात ठेवलेली ४५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले.

    एम. एम. स्वीट्स मालकाने दुकानातील नूतनीकरण कामासाठी रक्कम आणून ठेवली होती. परंतु, चोरट्यांनी त्यावर हात साफ केला. पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ञ बोलावून घेत पुढील तपास केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. याप्रकरणी दुकान मालकांच्या फिर्यादीनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.