वर्ष अखेरीस पर्यटकांच्या सेवेत ‘माथेरानची राणी’

मध्य रेल्वेने नेरळजवळील माथेरान पर्यटनस्थळावरील राणी मिनी ट्रेन पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू केली असून या वर्षाच्या अखेरपर्यंत ही ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे नॅरोगेज रेल्वे रुळाचे नुकसान झाल्यामुळे तीन वर्षांपासून मिनी ट्रेन सेवा बंद आहे. नेरळ ते माथेरान मार्गावर लोखंडी स्लीपर बदलून काँक्रीट स्लीपर लावण्याचे काम सुरू आहे.

    मुंबई : नेरळ-माथेरानची ‘क्वीन ऑफ माथेरान’च्या (Queen Of Matheran) नावाने प्रसिद्ध मिनी टॉय ट्रेन (Mini Toy Train) लवकरच सुरू होण्याची आशा आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) नेरळजवळील माथेरान (Matheran) पर्यटनस्थळावरील राणी मिनी ट्रेन पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू केली असून या वर्षाच्या अखेरपर्यंत ही ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे नॅरोगेज रेल्वे रुळाचे नुकसान (Damage The Narrow Guage Railway Track) झाल्यामुळे तीन वर्षांपासून मिनी ट्रेन सेवा बंद आहे. नेरळ ते माथेरान मार्गावर लोखंडी स्लीपर बदलून काँक्रीट स्लीपर (Concrete Sleeper) लावण्याचे काम सुरू आहे.

    दोन फूट नॅरोगेज लाईन ११४ वर्षांपूर्वी १९०७ मध्ये पीरभॉय कुटुंबाने कौटुंबिक उपक्रम म्हणून बांधली होती. ती आता युनेस्कोच्या हेरिटेज यादीत आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मते, सुमारे ५ कोटी रुपये खर्च करून पुनर्बांधणीचे काम केले जात आहे. नेरळ ते माथेरान या मार्गावर सुमारे ३७,५०० काँक्रीट स्लीपर टाकले जात आहेत.

    टॉय ट्रेन पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू
    २० किमी लांबीची नेरळ-माथेरान ट्रेन सेवा तीन वर्षांपूर्वी मुसळधार पाऊस आणि दरडस्खलनामुळे रेल्वे मार्ग खराब झाल्यामुळे बंद करण्यात आली होती. टॉय ट्रेन सध्या माथेरान आणि अमन लॉज या दोन स्थानकांवर चालते. टॉय ट्रेनचे एकूण पाच स्थानके आहेत. नेरळ आणि अमन लॉजदरम्यान जुम्मापट्टी आणि वॉटर पाईप नावचे स्थानके आहेत. टॉय ट्रेन गेल्या अनेक दशकांपासून पर्यटकांचे विशेषत: लहान मुलांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. पर्यटकांना टेकडीवर आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यासोबतच या गाड्या स्वस्त आणि जलद साहित्याची वाहतूक करण्यासही मदत करतात.

    नेरळ-माथेरान ट्रॅकचे नूतनीकरण आणि इतर सुरक्षेच्या कामांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायी होण्यास मदत होणार आहे. वर्षाच्या अखेरीस हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.