उद्या कोणाचं नशीब फळफळणार! शिंदे सरकारला मंत्रिमंडळात हवेत स्वच्छ चेहऱ्याचे मंत्री..जाणून घ्या कोण आहेत संभाव्य मंत्री

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्ता स्थापन करून १ महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात आहे.

  • अखेर शिंदे सरकारला मुहूर्त सापडला

मुंबई : राज्यातील (Maharashtra) शिंदे फडणवीस सरकारच्या (Shinde Fadnavis Government) मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त (Cabinet Expansion Muhurat) सापडला आहे. मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राजभवनावर हा शपथविधी पार पडणार आहे. यावेळी शिंदे गटाचे (Shinde Group) ८ आणि भाजपचे (BJP) १० असे १८ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्ता स्थापन करून १ महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार लांबला असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नंदनवन निवासस्थानी (Nandanvan Banglow) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेतला.

एकीकडे राज्यात पूरस्थिती, शेतीचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना मंत्रिमंडळ नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सातत्याने लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सांगितले होते. अखेर, मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात काही जुने तर काही नवीन चेहरे दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

स्वच्छ प्रतिमा असलेल्याना संधी

स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. काही नावावर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असाचा अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही इच्छा आहे.

शिंदे गटाचे संभाव्य मंत्री

गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, संदीपान भुमरे, संजय शिरसाट

भाजपचे संभाव्य मंत्री

चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, गणेश नाईक, सुरेश खाडे

आतापर्यंत यांची नावं झाली आहेत निश्चित

चंद्रकांत दादा पाटील, राधा कृष्ण विखे पाटील, सुधीर मुनंगटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, मिरज, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा मुंबई, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित