मंत्रिमंडळ विस्तार लवकरच…? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पुन्हा दिल्लीवारी; अमित शाहांच्या बैठकीत काय चर्चा होणार?

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगाने बदल होत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळं राज्यातील विविध विकासकामे, मंत्रिमंडळ विस्तार आदी विविध मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे.

    मुंबई– शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde fadnavis government) रखडलेला दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. कारण जानेवारीच्या अखेरीस मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त मिळेल, असं बोललं जात होत. काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळं चर्चांना उधाण आलं असून, दिल्लीवारीमुळं मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे.

    दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगाने बदल होत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळं राज्यातील विविध विकासकामे, मंत्रिमंडळ विस्तार आदी विविध मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे. यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेल्याने तेथे काय चर्चा होतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण एकिकडे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळं शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, अशी टिका विरोधकांनी केलीय.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या प्रचाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण विधिमंडळात करण्यात आले. यावरूनही राज्यात राजकीय नाट्य घडलं. त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राज्यातील कोणताही निर्णय दिल्लीशिवाय होत हेच दिसून आले आहे, अशी टिका विरोधकांनी केली आहे.