‘अहमदनगर’चं नाव बदललं; राज्य सरकारने दिली ‘या’ नावास मान्यता

राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अहमदनगर शहराचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच अहमदनगर शहराच्या नामांतराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर शहराचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी केली जात होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव अहमदनगरला देण्यात यावं, अशी मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अहमदनगर शहराचं नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    यापूर्वी औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं केलं आहे. त्यानंतर आज अहमदनगर शहराचे देखील नामकरण करण्यात आले. यापुढे अहमदनगर शहर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर म्हणून ओळखले जाणार आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं देखील नामांतर करण्यात आलं आहे. वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेण्यात आला आहे.

    मुंबईच्या आठ रेल्वेस्थानकांचे नामांतर 

    राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली. अहमदनगर शहर व वेल्हे तालुका यांसह मुंबईतील ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, करी रोड रेल्वे स्थानकाचं नाव लालबाग, सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी, मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी असं केलं जाणार आहे. तर चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगांव, कॉटन ग्रिनचे काळाचौकी, डॉकयार्डचे माझगांव, किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे तिर्थकर पार्श्वनाथ आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाना जगन्नाथ शंकर शेट असं नामांतरण केलं जाणार आहे.