Calcium deficiency in children due to junk food!

हॉटेलमधील सर्वात जास्त विकले जाणारे पदार्थ म्हणजे जंकफूड. लहान मुलांपासून थोर-ज्येष्ठांपर्यंत अनेकजण आवडीने जंकफूड खाताना दिसून येतात. एखाद्या वेळी हे जंकफूड खाणे ठीक आहे. परंतु, अनेक लहान मुले जंकफूड शिवाय इतर काही खातच नसल्याच्या तक्रारी वाढत आहे.

    गोंदिया : पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण बदलती जीवनशैली, मॉडर्न लाइफस्टाइल जपण्याच्या नावाखाली जंकफूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासोबतच आहारात पोषक तत्वाची कमतरता, स्थूलता अशा अनेक कारणांमुळे लहान मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे पालकांनी सतर्कता बाळगत मुलांच्या कॅल्शियम गरजेकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.

    शहरातील प्रत्येक चौकाचौकात तसेच छोट्या-मोठ्या हॉटेलमधील सर्वात जास्त विकले जाणारे पदार्थ म्हणजे जंकफूड. लहान मुलांपासून थोर-ज्येष्ठांपर्यंत अनेकजण आवडीने जंकफूड खाताना दिसून येतात. एखाद्या वेळी हे  जंकफूड खाणे ठीक आहे. परंतु, अनेक लहान मुले जंकफूड शिवाय इतर काही खातच नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. परंतु, यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये वाढत्या वयासोबतच हाडे आणि दातांचा विकास होत असतो.

    शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास हाडे ठिसळ होणे, दात लवकर तुटणे असे परिणाम दिसून येतात. यासोबतच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हात आणि पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे, स्नायू कमकुवत होणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. मात्र, पाल्य पालकाकडे जंकफूड खाण्यासाठी हट्ट करत असून अतिसेवनाने याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    हिरव्या भाज्यांचा वापर गरजेचा

    जंकफूड मध्ये फॅट आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक तर प्रोटीन, व्हिटॅमिनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे, त्यांच्या अतिसेवनामुळे कॅल्शियम, लोह कमी होण्याची शक्यता अधिक असते. यासोबतच लठ्ठपणामुळे इतर समस्या जसे उच्च रक्तदाब, हार्ट संबंधित समस्या कमी वयातच उद्भवू शकतात. त्यामुळे, पोषक आहार व हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आहारामध्ये करणे गरजेचे आहे.