भेटण्यास बोलवायचे अन् मारहाण करायचे; ब्लॅकमेलिंग करणाऱ्या बंटी-बबलीचा झाला भांडाफोड

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पकडलेल्या बंटी-बबलीने देशभरात तरुणांना ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळल्याचे समोर आले असून, बबली डेटींग अॅपवरून बोलवत अन् भेट झाल्यानंतर बंटी अचानक खोलीत शिरून त्यांना मारहाण करत पैसे उकळत होते.

  पुणे : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पकडलेल्या बंटी-बबलीने देशभरात तरुणांना ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळल्याचे समोर आले असून, बबली डेटींग अॅपवरून बोलवत अन् भेट झाल्यानंतर बंटी अचानक खोलीत शिरून त्यांना मारहाण करत पैसे उकळत होते. दोघांकडून तब्बल ५० लाख ६९ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

  नितीश नवीन सिंग (वय २८, रा. मूळ बिहार, सध्या दिल्ली), कविता उर्फ पूजा नवीनचंद्र भट (वय ३१, रा. उत्तराखंड, दिल्ली) अशी दोघांची नावे आहेत. त्यांनी पुण्यातील सात जणांना लुटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये व्यावसायिक आणि सीएसह तरुणांचा समावेश आहे. इतर राज्यात देखील त्यांनी असे गुन्हे केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

  ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शऩाखाली सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, सागर केकान, तुषार भिवरकर, अमेय राणा, इम्रान नदाफ, मनीषा पुकाळे यांच्या पथकाने केली.

  दोघांची एका इव्हेंटच्या कामानिमित्ताने ओळख झाली होती. ते दोघे विवाह करणार होते. दरम्यान त्यांनी संगणमत करून या माध्यमातून तरुणांना फसविण्याचा डाव सुरू केला. डेटिंग साईटवरील अनेक अ‍ॅपवर कविताने तिचे प्रोफाईल तयार केले. त्यातून ती ग्राहकांना आकर्षित करत होती. त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावत असे.

  रूम बुक केली असता ती प्रथम त्यांना भेटण्यास खोलीत जात. त्यानंतर अचानक पैशांची दुप्पट पैसे मागत असत. त्यानंतर बंटी अचानक रूममध्ये येत असत. तत्पुर्वी बबली बंटीला ग्राहकाचा फोटो व इतर माहिती मोबाईलवर सेंड करत होती. त्यानंतर बंटी आत शिरून त्या ग्राहकाला दमदाटी व मारहाण करुन आणखी जास्तीची रक्कम घेत होते. त्यांच्याकडून सोने देखील ते घेऊन त्यांना तेथून हाकलून देत होते.

  ५० लाख ६९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल

  ग्राहकांकडील मौल्यवान वस्तू, दागिने जबरदस्तीने चोरून लुटत होते. अशा प्रकारे पुण्यातील नागरिकांना आरोपींनी लुटले होते. पुण्यातील ७ नागरिकांना त्यांनी अशा प्रकारे लुटले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुण्यात आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये पुण्यासह महाराष्ट्र, हैदराबाद, बँगलोर या राज्यातील लोकांना सीकींग अ‍ॅडव्हेंचर डेटिंग अ‍ॅपद्वारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ५० लाख ६९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  डेटींग अ‍ॅपद्वारे नागरिकांना जाळ्यात ओढून लुटमार करणार्‍या महिलेसह दोघांकडून ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत ५० लाख ७० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, अशाच पद्धतीने फसवणूक झालेल्यांनी सामाजिक सुरक्षा विभागात संपर्क करावा.

  - भरत जाधव, वरिष्ठ निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग