‘हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’! उद्धव ठाकरे गटाचे प्रचार गीत प्रसिद्ध

आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मशाल चिन्हाचा इतिहास आणि भविष्य सांगणारे प्रचार गीत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

  मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्याचबरोबर यंदा राष्ट्रवादी व शिवसेना पक्षामध्ये दोन गट तयार झाल्यामुळे जोरदार लढत देखील होताना दिसत आहे. शरद पवार गट व ठाकरे गट यांना त्यांच्या नवीन चिन्हाचा देखील प्रसार व प्रचार करायचा आहे. आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मशाल चिन्हाचा इतिहास आणि भविष्य सांगणारे प्रचार गीत प्रसिद्ध करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत प्रचार गीत प्रसिद्ध केले आहे.

  काही दिवसांपूर्वी शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचे प्रचारगीत जाहीर करण्यात आले. यामध्ये महायुतीसह नरेंद्र मोदी यांची देखील झलक दाखवण्यात आली होती. कणखर बाणा आणि हाती भगवा असे बोल असलेले गाणे शिंदे गटाने प्रसिद्ध केले होते. यानंतर आता ठाकरे गटाकडून देखील अधिकृत प्रचारगीत जाहीर करण्यात आले. या गाण्याची सुरुवात प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून करण्यात आली असून बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांचे आणि विविध क्षणांच्या आठवणी दाखवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा देखील ठाकरे गटाच्या प्रचारगीतामध्ये दाखवण्यात आला आहे.

  ठाकरे गटाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रचारगीतामध्ये मशाल चिन्हाची महती गाण्यात आली आहे. हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’! अशा मथळ्याखाली हे गाणे जाहीर करण्यात आले आहे. एक मिनिटाच्या असणाऱ्या या गाण्याची सुरुवात तुतारी वाजवून करण्यात आली आहे. दृष्टशक्ती जाळण्या अन् मार्ग स्पष्ट दावण्या पेटू दे शिवसेनेची मशाल असे गाण्याचे बोल आहेत.

  काय म्हणाले उद्धव ठाकरे? 
  पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी त्यांचं नवं चिन्ह मशाल आणि चिन्हाचे प्रचार गीत लॉन्च केलं आहे. त्यात मशालीची तेज आणि आग कानाकोपऱ्यात पोहचेल अशी उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मशाल हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलं आहे. मशाल हे चिन्ह महाराष्ट्रात पोहोचलं आहे. तसंच हुकूमशाहीला ही मशाल भस्म करणार, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.