जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी तातडीने रद्द करा, रायगडच्‍या मराठा समाजाचे जिल्‍हाधिकारी यांना निवेदन

रायगडमधील सकल मराठा समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज अलिबागमध्‍ये एकत्र आले. पोलीस अधिक्षक कार्यालयापासून हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत जिल्‍हाधिकारी कार्यालयात पोहोचले.

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्‍या एसआयटीच्‍या मुद्यावर रायगड जिल्‍हयातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. ही एसआयटी चौकशी रद्द करावी, सगे सोयरे संदर्भातील अध्‍यादेश तातडीने काढावा आणि मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे करण्‍यात आली आहे.

    रायगडमधील सकल मराठा समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज अलिबागमध्‍ये एकत्र आले. पोलीस अधिक्षक कार्यालयापासून हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत जिल्‍हाधिकारी कार्यालयात पोहोचले. समन्वयक विनोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली. त्‍यांना आपल्‍या मागण्‍यांचे निवेदन देण्‍यात आले. मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्‍याचा निर्णय शासनाने घेतल्‍यामुळे मराठा समाजात सरकारबद्दल प्रचंड राग असल्‍याची भावना यावेळी बोलून दाखवण्‍यात आली. सगे सोयरे संदर्भातील अध्‍यादेश काढण्‍याचे तसेच आंदोलकांवरील गुन्‍हे दाखल करण्‍याचे आश्‍वासन देऊनही सरकारने ते पाळले नाही याची आठवण करून देण्‍यात आली.

    मराठा समाजाचा रोष ओढावून एकनाथ शिंदे यांचे आमदार पाडण्याचे षडयंत्र रचले गेले आहेत, हे त्यांना आता कळत नाही मात्र निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा सूचक इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला. मागील काही दिवसांपासून राज्‍य सरकार मराठा समाजावर सुड उगवतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. 4 महिने मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे. वाशी येथे लाखो मराठा बांधवांसमोर सगेसोयरे संदर्भातील अधिसूचना दिली आहे. तेव्‍हा मराठा समाजाचा विजय झाला अशी आमची भावना होती. परंतु दुर्दैवाने त्‍यावर अध्‍यादेश निघाला नाही. आता सनदशीर मार्गाने त्‍यासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांची चौकशी सुरू केली आहे. ही बाब निषेधार्ह आहे. सरकारने यावर वेळीच विचार करावा.