१३ बळी घेणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद; गडचिरोलीसह भंडारा, चंद्रपूरात दहशत

देसाइगंजलगत वळुमाता येथे बुधवारी या वाघाने गाईला ठार केले होते. त्यामुळे या शिकारीजवळच वनविभागाने दुसरे सावज बांधून वाघास आकर्षित केले. गुरुवारी सकाळी हा वाघ मारलेल्या शिकारीजवळ आला. तेव्हा बंकर केजमध्ये तैनात पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे, पोलिस नाईक (शार्पशूटर) ए. सी. मराठे, वन्यजीव अभ्यासक राकेश अहुजा आणि त्यांच्या टिमने तात्काळ बंदुकीतून डॉर्ट मारून त्याला बेशुध्द केले.

    गडचिरोली : १३ जणांचा बळी घेतलेल्या सीटी१ (CT1) या नरभक्षी वाघाला (Cannibal Tiger) जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला (Forest Department) यश आले आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील वडसा तालुक्यात या वाघाचा वावरत होता. नर असलेल्या सीटी १ या वाघाने वडसा वनविभागात ६, भंडारा (Bhandara) वनविभागात ४ आणि ब्रम्हपुरी वनविभागात ३, अशा १३ जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांनी दिल्या होत्या.

    देसाइगंजलगत वळुमाता येथे बुधवारी या वाघाने गाईला ठार केले होते. त्यामुळे या शिकारीजवळच वनविभागाने दुसरे सावज बांधून वाघास आकर्षित केले. गुरुवारी सकाळी हा वाघ मारलेल्या शिकारीजवळ आला. तेव्हा बंकर केजमध्ये तैनात पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे, पोलिस नाईक (शार्पशूटर) ए. सी. मराठे, वन्यजीव अभ्यासक राकेश अहुजा आणि त्यांच्या टिमने तात्काळ बंदुकीतून डॉर्ट मारून त्याला बेशुध्द केले. त्यानंतर वडसा वनविभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी वाघ शुध्दीवर येण्यापूर्वी कोणतीही इजा न होऊ देता वाघाला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले.

    वाघाला जेरबंद केल्याची माहिती मिळताच गडचिरोलीचे वनसंरक्षक यांनी भेट देवून जेरबंद वाघाला गोरेवाडा येथे पाठवण्याबाबत वरिष्ठाचे मार्गदर्शन घेतले. सीटी १ वाघाने डिसेंबर २०२१ पासून आतापर्यंत १३ जणांचा बळी घेतल्यामुळे स्थानिकांमध्येही या वाघाबद्दल रोष निर्माण झाला होता. स्थानिकांनी लोकप्रतिनिधीद्वारे वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली होती.