खड्यात गाडी आदळून अपघात; तरुणाचा मृत्यू; वडील गंभीररित्या जखमी

    पुणे : पुण्यात खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, सहप्रवासी त्याचे वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. खडकवासला धरणावरील पुलापासून पन्नास मीटरवर एनडीए रोडकडे जाणाऱ्या अपघात घडला आहे. प्रसाद गोविंद करंजावणे (वय ३१, रा. भुकुम, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, गोविंद दगडू करंजावणे (वय ६५) हे गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांचा हात फॅक्चर झाला आहे.

    गंभीर मार लागल्याने प्रसाद यांचा दुर्दैवी मृत्यू

    याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद हे दुचाकीवरून त्यांच्या वडिलांसह खडकवासला धरणावरील पुलावरून जात होते. या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. पूल क्रॉस केल्यानंतर पन्नास मीटर अंतरावर एनडीए रोडकडे जात असताना त्यांची दुचाकी एका खड्यात आदळली आणि ते खाली कोसळले. यात गंभीर मार लागल्याने प्रसाद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, वडिल गोविंद यांचा हात फॅक्चर झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

    मुंबई-बेंगलोर महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू
    मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नवले ब्रिज क्रॉसकरून उतारावर भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने रिक्षाला धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, एकजन जखमी झाला आहे. यशवंत नारायण झांझुर्णे (वय ५४, रा. विक्रोळी वेस्ट, मुंबई) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बस चालकावर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत मुलगा अनिकेत झांझुर्णे (वय २४) यांनी सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. अनिकेत, त्याचे वडिल यशवंत व नातेवाईक हे रिक्षाने पहाटे साडे पाचच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गाने जात होते. त्यांनी नवले ब्रिज क्रॉसकरून नर्हे येथील उतारावर आल्यानंतर पाठिमागून आलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या रिक्षाला पाठिमागून जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झाल्याने यशवंत यांचा मृत्यू झाला. तर, अनिकेत व इतर किरकोळ जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.