तुका म्हणे पवारा..! शरद पवारांवर अभिनेत्री केतकी चितळेची आक्षेपार्ह पोस्ट, गुन्हा दाखल

दरम्यान आता केतकी विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. केतकीविरोधात कळवा पोलिस ठाण्यात कलम ५००, ५०५(२), ५०१ आणि १५३ A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मराठी अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच निरनिराळ्या कारणासांठी चर्चेत असते. यावेळीही तिने केलेल्या एका पोस्टमुळे ती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोशल मीडियावर ती फार सक्रीय असते. तिने फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर ती चांगलीच ट्रोल होत असून तिच्यावर टीकाही होत आहे.

  दरम्यान आता केतकी विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. केतकीविरोधात कळवा पोलिस ठाण्यात कलम ५००, ५०५(२), ५०१ आणि १५३ A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटकेंनी हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे. असं म्हटलं जात आहे.

  नेहमीच सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे केतकी अनेकदा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोलदेखील करत असतात. नेटके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, केतकी चितळेनं ही पोस्ट केल्यामुळं पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीनं ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनं केली असल्याची तक्रार नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली आहे.

  केतकीने अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली ही (कविता) पोस्ट केतकी चितळेने शेअर केली. नुकतंच शरद पवारांनी जवाहर राठोड यांची कविता सादर केली होती. त्यानंतर त्यावरुन भाजपकडून टीका झाली होती. याच कवितेच्या अनुषंगाने केतकीनं ही पोस्ट केली आहे.

  केतकीने काही टीव्ही मालिंकामध्ये काम केलं आहे. ‘तुझं माझं ब्रेकअप’, आंबट गोड या मालिकांच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे.