नामदेवराव जाधव शाईफेक प्रकरणी पुण्यात 10 ते 15 अज्ञातांवर गन्हा दाखल!

सध्या नामदेव जाधव त्यांच्या तक्रारीवरुन विश्रामबाग पोलिसांत 10 ते 15 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मोटिव्हेशनल स्पिकर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच संतापले होते.  शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्यावर शाईफेक केली होती. या घटनेमुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणी आता नामदेव जाधव यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन विश्रामबाग पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नेमकं काय घडलं?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल नामदेवराव जाधव यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय येथे नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता. मात्र, हा कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल नामदेव जाधव माहिती देत असताना शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला अचानक काळं फासलं. हा सगळा प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेने राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

    पुण्यात 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल

    या घडलेल्या प्रकरणावर नामदेव जाधव यांनी प्रतिक्रीया दिली होती. मी यासंदर्भात गुन्हा दाखल करणार असून यामध्ये पहिलं नावं हे शरद पवार आणि रोहित पवारांचं असेल. तसेच त्या दोघांची आमदारकी, खासदारकी रद्द करण्याची मागणी देखील करणार असल्याचं नामदेव जाधव यांनी यावेळी म्हटलं होतं. सध्या  त्यांच्या तक्रारीवरुन विश्रामबाग पोलिसांत 10 ते 15 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.