मुंबईतील वाढतं प्रदूषण ठरतय डोकंदुखी, एका बिल्डर विरोधात सांताक्रूझ पोलीसात पहिला गुन्हा दाखल

शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नागरी संस्थेवर जोरदार टीका केली.

    गेल्या काही दिवसापासून देशातील महत्त्वाच्या शहरांमधील प्रदूषण (Air Pollution)वाढताना दिसत आहे.  दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांना या प्रदुषणाचा फटक बसला आहे. अशातच दिवाळीमुळे तर प्रदुषणात आणखी वाढ झाली आहे. या वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. आता या प्रकरणी पोलिसांनीही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबई पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयानं (Bombay High Court) दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं आणि शहरात वायू प्रदूषण निर्माण केल्याप्रकरणी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एका बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सांताक्रूझ पोलिसांत गुन्हा दाखल

    मुंबईतील वाढतं प्रदूषण आता सगळ्यांसाठी डोकंदुखी ठरतं आहे. दिवसेंदिवस मुंबईच्या हवेची गुणवत्ता खराब होत आहे. याविरोधाच कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयानं नागरी संस्थेवर टीक केली. शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याच्या सुचना देऊनही प्रदूषण वाढल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे पुरेशा उपाययोजना अपयशी ठरल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नागरी संस्थेवर जोरदार टीका केली. त्यानंतर बीएमसीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी बिल्डरविरुद्ध नोंदवलेला हा पहिला एफआयआर आहे. सांताक्रूझ पोलिसांनी सोमवारी भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 291 (बंद करण्याच्या आदेशानंतर उपद्रव चालू ठेवणं) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.