पुण्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; पंतप्रधानांचा पुतळा जाळल्याप्रकरणी कारवाई

पुण्यामध्ये कॉंग्रेस युवक कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पुतळा जाळणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे – पुण्यामध्ये कॉंग्रेस युवक कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पुतळा जाळणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. झाशीची राणी चौकामध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भर रस्त्यावर पुतळा जाळला होता. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर पुण्यातील राजकारण तापले असून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे.

    काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक समस्यांवर ऊहापोह झाल्यानंतर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा प्रकाशझोतात आला. शेतकऱ्यांच्या या मोर्चामध्ये दिल्ली-हरयाणा सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात जमले. कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. भर रस्त्यांवर जाळलेला पुतळा घेऊन कॉंग्रेस कार्यकर्ते पळत होते. त्यावेळी तेथे बंदोबस्तास असलेले डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत यांनी कार्यकर्त्यांना रोखले आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

    पुण्यातील कॉंग्रेसच्या या आंदोलनाची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक उलट सुलट प्रश्न उपस्थित करण्यात आले. याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ बंटी बाबा शेळके, प्रथमेश विकास आबनावे, एहसान अहमद खान, मुरलीधर सिद्धाराम बुधरामस, राहुल दुर्योधन शिरसाट यांच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.