संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

वनपरिक्षेत्र पुणे अंतर्गत हवेली तालुक्यातील मौजे वडगाव शिंदे येथे मृत झालेल्या बिबट्याचे अवयव चोरल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे : वनपरिक्षेत्र पुणे अंतर्गत हवेली तालुक्यातील मौजे वडगाव शिंदे येथे मृत झालेल्या बिबट्याचे अवयव चोरल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

    नवनाथ खांदवे यांच्या शेतात बिबट मृत असल्याचे दिसून आल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत बिबटयाला ताब्यात घेतले. ९ फेब्रुवारीला मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याच्या पायाची ३ नखे व पंजा धारधार शस्त्राने कापून काढल्याचे दिसून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन श्वान पथकाच्या साहाय्याने तपास केला.

    ऊसतोडणी मजूर यांच्याकडे चौकशी केली असता एका अल्पवयीन मुलाने वडिलांच्या व सोबतच्या २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याची ३ नखे व पायाचा पंजा व त्याचे १ नख अशी एकूण ४ नखे कोयता व सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवल्याचे सांगितले. तसेच बिबट्याच्या नखाचे गळ्यातील लॉकेट बनविण्याच्या आकर्षणापोटी गुन्हा केल्याचे सांगितले.

    आरोपीकडून ४ नखे १ पायाचा पंजा व गुन्ह्यात वापरलेले २ सुरे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी कांतीलाल चांदरसिंग सोनवणे आणि २ अल्पवयीनांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या नेतृत्वात सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी केली.