रेंदाळ बँकेतील कोट्यवधींच्या अपहारप्रकरणी व्यवस्थापकासह रोखपाल बडतर्फ

हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील प्रख्यात आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेच्या (Rendal Bank) इचलकरंजी शाखेत सुमारे १ कोटी ६० लाख ३० हजार रुपयांचा अपहार करणाऱ्या शाखा व्यवस्थापक रयाजी गणपती पाटील व रोखपाल किरण तानाजी पाटील यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. 

    हुपरी : हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील प्रख्यात आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेच्या (Rendal Bank) इचलकरंजी शाखेत सुमारे १ कोटी ६० लाख ३० हजार रुपयांचा अपहार करणाऱ्या शाखा व्यवस्थापक रयाजी गणपती पाटील व रोखपाल किरण तानाजी पाटील यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

    याशिवाय कर्ज मंजूर करणारे अधिकारी प्रभाकर भोरे यांना निलंबित करण्यात आले असून, याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या स्थावर मिळकतींची विक्री करुन अपहारातील कोट्यवधी रुपये वसूल करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अरुण महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    संबंधित शाखा व्यवस्थापक व रोखपाल हे इचलकरंजी शाखेत कार्यरत असताना तेथील संशयास्पद व्यवहाराची कुणकुण लागताच बँकेच्या वतीने अंतर्गत लेखापरीक्षण व चार्टर्ड अकाउंटंट डी. ए. चौगुले यांच्याकडून रितसर पद्धतीने शासकीय लेखापरीक्षण घेतले असता इचलकरंजी शाखेत बनावट कर्ज प्रकरणे, बोगस सोने तारण अशा व्यवहारात संबधितांनी सुमारे १ कोटी ६० लाख ३० हजार रुपयांचा अपहार निदर्शनास आले होते.

    याबाबत बँकेच्या वतीने तत्काळ कारवाई करण्यात आली. तसेच संबंधितांच्या मिळकतींची विक्री करण्यात येणार आहे. त्याबरोबर आर्थिक गुन्हे शाखा व जिल्हा पोलीस प्रमुख, रिझर्व्ह बँकेला या अपहाराची माहिती दिली आहे. शाखा व्यवस्थापक रयाजी पाटील व रोखपाल किरण पाटील या दोघांना सेवेतून बडतर्फ तर अधिकारी प्रभाकर भोरे यांना निलंबित करण्यात आले आहे. या अपहाराची खातेनिहाय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.