इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत जोडो यात्रेत महिलांचा लक्षवेधी पेहराव

"हिंदू - मुस्लिम वेगवेगळे नाहीत. आम्ही सर्व एकच आहोत, मराठी आहोत. या पोशाखातून मला महाराष्ट्राची संस्कृती दाखवून द्यायची होती. इतरांच्यापेक्षा वेगळा पोशाख असल्याने मला राहुलजींनी बोलावून घेतले. त्यांची भेट झाली, समाधान वाटले. आता भारत जोडो यात्रेचा उद्धेश सुद्धा असाच पूर्ण होईल, याची खात्री वाटते," असे त्यांनी सांगितले.

    बुलढाणा – महिलांची विशेष पदयात्रा काढून शनिवारी देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची जयंती भारत जोडो यात्रेने (Bharat Jodo Yatra) मोठया उत्साहात साजरी केली. राहुल गांधीसोबत शेगाव येथून महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. काही महिलांनी भरजरी फेटे बांधले होते. तर काहींनी आकर्षक वेशभूषा केल्या होत्या. यात्रा मार्गावर ग्रामीण भागात महिलावर्ग हजारोंच्या संख्येने स्वागतासाठी उभा होता. नागपूर येथील प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी नफिसा सिराज अहमद यांनी अस्सल मराठमोळी “नऊवारी” पोशाख केला होता. त्यांची वेशभूषा लक्षवेधी ठरली होती.

    याबाबत त्या म्हणाल्या,”हिंदू – मुस्लिम वेगवेगळे नाहीत. आम्ही सर्व एकच आहोत, मराठी आहोत. या पोशाखातून मला महाराष्ट्राची संस्कृती दाखवून द्यायची होती. इतरांच्यापेक्षा वेगळा पोशाख असल्याने मला राहुलजींनी बोलावून घेतले. त्यांची भेट झाली, समाधान वाटले. आता भारत जोडो यात्रेचा उद्धेश सुद्धा असाच पूर्ण होईल, याची खात्री वाटते,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत वर्षाताई गुजर, आशाताई राऊळ, उषाताई कुकटे आणि अन्य सहकारी उपस्थित होत्या.

    श्रिया विनोद रगडे या जलंब येथील तेरा वर्षाच्या मुलीला राहुलजी भेटल्यापासून ती आनंदाच्या भरात उड्या मारत होती. काय सांगू आणि काय नको झाले होते. आपल्या दारात राहुजींची यात्रा येताच आईसोबत तिने त्यांचे औक्षण केले. मग राहुलजींनी आपुलकीने विचारपूस केली आणि ती आनंदून गेली. “काय सांगू, राहुजींना मी कधीच पाहिले नव्हते. आज आम्ही त्यांना भेटलो आणि मला खूप आनंद झाला आहे,” असे तिने सांगितले.

    प्रियाची आई दीपाली सुद्धा राहुलजींना भेटून खूप आनंदी होत्या. “शिक्षण घेऊनसुद्धा आमचा काहीच उपयोग नाही. नोकरी नाही, शेतमजुरी करून दिवस काढत आहोत. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत,” अशी व्यथा मांडली. त्यांच्या आजूबाजूच्या महिलांचीही तशीच स्थिती आहे. बेरोजगारी आहे, महागाई प्रचंड आहे. खायचे काय आणि मुलांना शिक्षण कसे द्यायचे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे? राहुलजींनी या सर्वांच्या व्यथा आस्थेवाईकपणे जाणून घेतल्या.