cctv

  तासगाव : तासगाव नगरपालिकेने शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र तांत्रिक बिघाडामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हे कॅमेरे बंद आहेत. दोनच दिवसांपूर्वी येथील डॉ. अंजली पाटील यांच्या हॉस्पिटलमधून एका बालकाचे अपहरण झाले. त्यावेळीपासून सीसीटीव्हीचा विषय ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही दुरुस्तीस पालिका प्रशासन चालढकल करत असल्याने पोलिसांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

  तासगाव शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपालिकेने शहरातील विविध ठिकाणी सुमारे १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तर पोलीस ठाण्यानेही अनेक ठिकाणी स्वतंत्ररित्या कॅमेरे बसवले आहेत. तासगाव शहर तसे संवेदनशील शहर आहे. गुन्हेगारी टोळक्याची हुल्लडबाजी, फाळकुटदादांची गुंडगिरी, छेडछाड, बाजारपेठेत चोऱ्या असे अनेक प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असणे अत्यंत गरजेचे होते. मात्र नगरपालिकेने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत.

  तपासकामात पोलिसांना अडचणी
  कॅमेरे बंद असल्याने अनेक गुन्ह्यांच्या तपासकामात पोलिसांना अडचणी येत आहेत. पोलिसांनी याबाबत नगरपालिकेला पत्रव्यवहार केला आहे. बंद असलेले सीसीटीव्ही दुरुस्त करावेत, अशी मागणी केली आहे. मात्र गेल्या पालिका प्रशासनाने सीसीटीव्ही दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे आजतागायत सीसीटीव्ही बंद आहेत.

  फुटेजवरून महिलेचा शाेध
  दोनच दिवसांपूर्वी येथील डॉ. अंजली पाटील यांच्या हॉस्पिटलमधून एका अर्भकाचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून अपहरण करणारी महिला शोधण्यात आली. मात्र जर शहरातील नगरपालिकेचे सीसीटीव्ही सुरू असते तर आणखी गतीने या प्रकरणाचा तपास झाला असता. त्यामुळे या अपहरण प्रकरणाने पालिकेच्या बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी लक्ष देऊन हे सीसीटीव्ही तातडीने सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

  शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालिकेने १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे बसवून अडीच ते तीन वर्षे झाली आहेत. मात्र त्याचा मेंटेनन्स झाला नाही. त्यातच पावसाळा असल्याने हे सीसीटीव्ही बंद पडत आहेत. मात्र, गेल्या दीड-दोन महिन्यांपासून वार्ड रचना, आरक्षण व अन्य निवडणुकीच्या कामात असल्याने सीसीटीव्हीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. मात्र कॅमेराचा मेंटेनन्स करणाऱ्या सबंधित व्यक्तीला सांगितले आहे. येत्या आठवडाभरात बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करू.

  - पृथ्वीराज पाटील, मुख्याधिकारी