पुण्यात राजकारण बाजूला ठेवून धुळवड साजरी; विशेष मुलांनीही मनसोक्त लुटला आनंद

लाेकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अद्याप रंग चढला नसला तरी राजकारण बाजूला ठेवत राजकीय मंडळींनी एकत्र येत एकमेकांवर रंग उधळीत धुळवड साजरी केली.

  पुणेे : लाेकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अद्याप रंग चढला नसला तरी राजकारण बाजूला ठेवत राजकीय मंडळींनी एकत्र येत एकमेकांवर रंग उधळीत धुळवड साजरी केली. याला निमित्त ठरले ते भाेई प्रतिष्ठानच्या वतीने आयाेजित ‘रंग बरसे ’ या कार्यक्रमाचे.

  दरवर्षी प्रमाणे शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने वंचित घटकातील मुलांसाठी ‘रंग बरसे ’ या रंगोत्सवाचे सोमवारी (दि. २५) आयोजन करण्यात आले हाेते. लहान मुलांसह विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी रंग बरसेचा आनंद लुटला. यात नेहमीप्रमाणे राजकीय व्यक्तींनी सहभाग नाेंदविला हाेता. राजकीय मतभेद विसरत राजकीय मंडळींनी ‘रंग बरसे’ या कार्यक्रमात सहभाग नाेंदवित एकमेकांच्या अंगावर रंग उधळला.

  भाजपच्या राज्यसभेवर निवडून आलेल्या खासदार मेधा कुलकर्णी, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर, राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी या तिघांनी एकमेकांना रंग लावून राजकारण आजच्या दिवशी विसरायचं आणि सणाचा आनंद लुटायचा आहे अशी प्रतिक्रिया दिली. महायुतीचे उमेदवार आणि माजी महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाच्या आयाेजनात डाॅ. मिलींद भाेई , प्रमाेद परदेशी यांचा वाटा माेठा हाेता.

  हा कार्यक्रम रास्ता पेठेत क्वार्टरगेट जवळ हॉटेल शांताई समोरील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यात ऊसतोडणी कामगारांची मुले, देवदासींच्या मुले, अनाथ, अंध, मूकबधिर तसेच रस्त्यावर फुगे विकणारी, डोंबाऱ्याचा खेळ करणारी तसेच विविध सामाजिक संस्थांमधील मुला- मुलींनी आनंद लुटला.

  मुस्लिम बांधवांकडून शिरखुर्मा वाटप देखील करण्यात आला. यंदाच्या या उपक्रमात विविध संस्था संघटनेच्या या मुला – मुलींनी विविध हिंदी, मराठी गाण्यांवर होळी खेळत आनंद लुटला.

  पुणे शहरात सण उत्साहात

  पुणे शहरात रविवारी पारंपरिक पद्धतीने हाेळी पाैर्णिमा साजरी झाली. विविध मंदीरे , गणेश मंडळ, जुने वाडे, नवीन गृहरचना संस्थांच्या ठिकाणी हाेळी पेटवून पूजन करण्यात आले. साेमवारी धुलिवंदनाच्या निमित्ताने रंगाची उधळण करत तरुणाईने आनंद लुटला. शहरच्या अनेक भागांत तरुण – तरुणींचे गट एकमेकांना रंग लावत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तर रंग न लावून घेणाऱ्या मित्रांच्या मागे धावून त्याला पकडून रंग लावण्याचा आनंदही घेत असल्याचे अनेक ठिकाणी पाहण्यास मिळाले.