नवीन रचना करण्यास प्रारंभ ; २०११ ची जनगणना ग्राह्य धरली जाणार

राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने प्रभागांची नवीन रचना करण्यास सुरुवात केली आहे. त्याकरीता २०११ ची जनगणना ग्राह्य धरली जाणार आहे. तर मतदारसंख्या मात्र २०२२ ची ग्राह्य धरून प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे.

    पुणे : राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने प्रभागांची नवीन रचना करण्यास सुरुवात केली आहे. त्याकरीता २०११ ची जनगणना ग्राह्य धरली जाणार आहे. तर मतदारसंख्या मात्र २०२२ ची ग्राह्य धरून प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे. यामुळे काही प्रभांगात लाेकसंख्या आणि मतदारसंख्या कमी जास्त हाेण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना करताना मतदार याद्या कशा फाेडव्यात याचे आव्हान महापालिका प्रशासनासमाेर आहे.

    -पुण्यात लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट
    पुण्यासह राज्यातील महापालिका आणि नगरपालिका यांच्या आगामी निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तसेच प्रभाग रचना तयार करताना २०११ जी जनगणना ग्राह्य धरण्याचे स्पष्ट केले आहे.

    महापालिकेच्या एक सदस्यीय पद्धतीने २००७ मध्ये निवडणूका झाल्या होत्या. त्यासाठी २००१ ची जनगणना ग्राह्य धरून वॉर्ड रचना करण्यात आली होती. त्यानंतर २०११ मध्ये केंद्र सरकारकडून नव्याने जनगणना करण्यात आली. २००१ आणि २०११ च्या जनगणनेचा तुलनात्मक अभ्यास प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतर जुन्या पुण्यात लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे लोकसंख्या कमी आणि मतदार संख्या जास्त होणार असल्याचे यापूर्वी केलेल्या प्रभाग रचनेत समोर आले होते.

    आगामी निवडणूकांबाबत राज्य सरकारकडून निर्णयात होणाऱ्या वारंवार बदलामुळे २०२३ मध्ये होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी विधानसभा मतदार संघातील मतदार संख्या तसेच राज्य निवडणूक आयोग जी तारीख निश्‍चित करून देईल, तो कट ऑफ डेटची मतदार संख्या विचारात घेऊन याद्या फोडून त्यानंतर प्रभाग रचना तयार करावी लागणार आहे. त्यामुळे ही तफावत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

    -महापालिकेला प्रारूप प्रभाग रचना करावी लागणार
    जनगणना न झाल्यामुळे मध्यंतरी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कायद्यात बदल करीत सदस्य संख्येत वाढ केली.तो बदल बेकायदा असल्याचे कारण पुढे करीत शिंदे सरकारकडून तो रद्द करण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा २०११ ची जनगणना ग्राह्य धरून महापालिकेला प्रारूप प्रभाग रचना करावी लागणार आहे. महापालिका निवडणूका नवीन वर्षात होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या निवडणूकीसाठी मतदार संख्या ग्राह्य धरताना जानेवारी महिन्यातील मतदार संख्या ग्राह्य धरावी लागणार आहे. त्यामुळे नव्याने प्रभाग रचना करताना मतदार याद्या कशा फोडाव्यात, असा प्रश्‍न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. कारण १२ वर्षांपूर्वीच लोकसंख्या विचारात घेतली, तर अनेक प्रभागात मतदार संख्या ही लोकसंख्यापेक्षा जास्त असणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जनगणना वेळेत न झाल्यामुळे त्याचा फटका जसा शासकीय योजनांना बसला आहेत.तसाच तो महापालिका निवडणुकांना देखील बसणार असल्याचे, या निमित्ताने समोर आले आहे.